खासदार गिरीश बापट 
खासदार गिरीश बापट  सरकारनामा
पुणे

खासदार बापट म्हणाले; सोळापैकी चारच नगरसेवक उपस्थित कसे? मला रिपोर्ट द्या !

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला सोळापैकी चारच नगरसेवक उपस्थित असल्याचे पाहून खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी नाराजी व्यक्त केली.उर्वरित बाराजण का आले नाहीत याचा जाब विचारत ते का आले नाहीत याचा रिपोर्ट मला द्या, असा आदेश खासदार बापट यांनी दिला.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या समोरच बापट यांनी नाराजी व्यक्त करीत पक्षाचे काम वाढत असताना शिस्त व कर्तव्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कसबा विधानसभा मतदारसंघाच्यावतीने आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यावेळी खासदार बापट बोलत होते.

महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. गेल्यावेळी प्रचंड यश मिळवून भारतीय जनता पार्टी सत्तेत आली होती. गेली पाच वर्षे पक्ष सत्तेत आहे.त्यामुळे येत्या निवडणुकीत पक्षाला सत्ता राखण्याचे आव्हान आहे. त्यामुळे शिस्त पाळणे प्रत्येकाचे काम आहे, असे सांगत जे अनुपस्थित आहेत. त्यांना जाब विचारा व आमदार मुक्ता टिळक यांची भेट घायला सांगा, असा आदेशच खासदार बापट यांनी जाहीर कार्यक्रमात दिला.शिवाय जे आली नाहीत त्यांचा रिपोर्ट स्वतंत्रपणे मलापण द्या, असे नगरसेवक राजेश येनपुरे यांना सांगितले.

कसबा विधानसभा हा भारतीय जनता पार्टीचा बोलकिल्ला आहे.त्यातच खासदार बापट यांचा घरचा मतदारसंघ आहे. खासदार बापट यावेळी पहिल्यांदा खासदार झाले असले तरी गेली २५ वर्षे त्यांनी आमदार म्हणून कसबा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.त्यामुळे कसब्यातील कार्यक्रमाला सर्व नगरसेवक नसल्याचे त्यांना चांगलेच खटकले.त्यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत जाब विचारला आहे.

पुण्यातल्या पक्ष संघटनेवर बापट यांचे सुरवातीपासून वर्चस्व आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर पाटील यांचा पुण्यातील वावर साहजिकच वाढला आहे.त्यामुळे खासदार बापट यांच्याऐवजी संघटनेत पाटील यांचा वरचष्मा दिसतो.त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार बापट यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे. खासदार बापट हेच पुण्याचे नेते आहेत. पुण्याची महापालिका निवडणूक खासदार बापट यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही लढणार असल्याचे याआधीच प्रपदेशाध्यक्ष पाटील यांनी जाहीर केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT