मुंबई : पुरोगामी लोकशाही आघाडीमध्ये (यूपीए) बदल होण्याची गरज आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) तुलनेत विद्यमान यूपीए कुमकवत झाली आहे. त्यामुळे माझ्यासह देशभरातील अनेक नेत्यांची इच्छा आहे की, यूपीएचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी करावे, त्यासाठी एक मोहीम चालविण्यात येणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यासाठी तयार असून अखिलेश यादवही तयार होतील, असे सूचक वक्तव्य काँग्रेसमधून राष्ट्रवादीत (ncp) प्रवेश केलेल्या सिराज मेहंदी यांनी पवारांच्या उपस्थितीत केले. (Sharad Pawar should lead UPA : Siraj Mehndi)
उत्तर प्रदेशमधील काँग्रेस बुजुर्ग नेते, माजी आमदार सिराज मेहंदी यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मेहंदी यांनी वरील विधान केले. ते म्हणाले की, मी एका कारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो आहे. उत्तर प्रदेशमध्येही मी त्याबाबत वक्तव्यही केले होते. ‘यूपीए’मध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. विद्यमान यूपीए ही एनडीएच्या तुलनेत दुबळी पडलेली आहे, त्यामुळे माझ्यासह अनेक नेत्यांना असे वाटते की, यूपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे. तरच यूपीए आगामी २०२४ च्या निवडणुकीत ‘एनडीए’शी ताकदीने लढू शकेल; अन्यथा ताकदवान एनडीएशी लढणे कठीण होऊन बसेल. त्यासाठी एक मोहिम देशभरात चालवावी लागेल. देशभरातील राजकीय नेत्यांशी चर्चा करावी लागेल, असेही मेहंदी यांनी या वेळी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन यांनी माझ्याशी संपर्क साधला. आमची लखनौमध्ये चर्चा झाली. त्यांनी शरद पवारांना याबाबत सांगितले, त्यानंतर त्या मला येथे घेऊन आल्या, असे सांगून माजी आमदार मेहंदी म्हणाले की, मी यापूर्वीही राष्ट्रवादीत होतो. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आहे, त्या निवडणुकीत चांगली मते मिळवली होती.
उत्तर प्रदेशात भाजपला २० टक्के, तर ८० टक्के मते ही भाजपच्या विरोधात जातील, असेही त्यांनी सांगितले. यूपीतील २०२२ ची हवा २०२४ पर्यंत दिल्लीत घेऊन जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात १८४ आमदार विधानसभेत धरणे आंदोलनाला बसले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्या ठिकाणी आल्यानंत त्यांनी ते आंदोलन मागे घेतले. भाजपत हे बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. ह्या सर्वांचा परिणाम विधानसभा निवडणुकीत नक्की दिसून येईल, असा विश्वासही सिराज मेहंदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
मेहंदी म्हणाले की, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादवही गेल्या काही दिवसांपासून सक्रीय झाले आहेत. उत्तर प्रदेशमधून भाजपला हटविण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. योगी आणि मोदी हे चुकीचे काम करत आहे. यूपीत बदलाची हवा आहे. शरद पवार हे तर बदलाचे मास्टर मानले जातात. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे बदल केला, त्याप्रमाणे ते यूपीतही बदल करून दाखवतील. आम्ही सर्वजण मिळून भाजपला हरवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
सिराज मेहंदीच्या वक्तव्यावर पवार म्हणाले...
दरम्यान, ‘यूपीए’बाबत सिराज मेहंदी यांनी जे वक्तव्य केले, त्याबाबत मी सहमत नाही. यूपीए म्हणून आम्ही सर्वांनी मिळून पर्याय देण्याची गरज आहे. देशातील काही राज्यांचा विचार करता काँग्रेसला बेदखल करून चालणार नाही. काँग्रेस पक्षासह सर्वांना एकत्र घेऊन जावे लागणार आहे. काँग्रेस स्वबळावर जाण्याची तयारी करत असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे. पण आम्ही काँग्रेससह सर्व पक्ष एकत्र घेऊन जाण्याच्या विचाराचे आहोत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.