Sanjay Raut, Murlidhar Mohol sarkarnama
पुणे

मोहोळांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या ; राऊतांचा हल्लाबोल

भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी युद्धात पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील घोटाळ्यांचा समावेश आहे काय?

सरकारनामा ब्युरो

पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर आरोप करुन भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे. राऊतांनी भाजपला त्यांच्या नेत्यांनी केलेल्या भष्ट्राचाराची आठवण करुन दिली आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), पिंपरी-चिंचवड महापालिका भाजप स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे.

''पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील स्मार्ट सिटी घोटाळा ही जनतेच्या पैशांची लूट असून भाजपचेच लोक त्या लुटीचे भागीदार आहेत. नागपूर महापालिकाही या कामी मागे नाही. त्यामुळे भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी युद्धात पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील घोटाळ्यांचा समावेश आहे काय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

''मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav)यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांचे पथक पोहोचले. त्यांना जो तपास करायचा तो करतील, पण भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्यांना एक आठवण करून द्यायची आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजप स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना महापालिकेतच लाखो रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाली व आठवडाभर जेल भोगून ते पुन्हा स्थायी समितीचा पुढला भ्रष्टाचार करण्यासाठी रुजू झाले. यावर भाजपवाले तोंड का उचकटत नाहीत?,'' असे राऊत म्हणाले.

''किरीट व नील सोमय्या या पिता-पुत्रांनी राकेश वाधवानच्या मदतीने केलेला घोटाळा भविष्यात त्यांना तुरुंगात ढकलत नेणार आहे. कर नाही तर डर कशाला हे भाजपवाल्यांचे म्हणणे मान्य केले तर घामाघूम झालेले नील किरीट सोमय्या हे सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी का गेले आहेत?, अशी विचारणा राऊतांनी केली आहे.

''केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे शिखंडीच्या हातातील हत्यारे झाली आहेत. व देशाला त्यापासून धोका आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याची बदनामी करण्यासाठी हे शिंखडी अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचले आहेत, पण या शिंखडींच्याही कमरेला धोतर आहे व त्याची गाठ सुटू शकते हे त्यांनी विसरु नये,'' असा टोला राऊतांनी भाजपच्या नेत्यांना हाणला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT