Supriya Sule
Supriya Sule Sarkarnama
पुणे

एसटी बसची वाट पाहत थांबलेल्या विद्यार्थिनींना खासदार सुप्रिया सुळेंनी दिली लिफ्ट!

राजकुमार थोरात - Sarkarnama

वालचंदनगर (जि. पुणे) : एस. टी. बसची वाट पाहत थांबलेल्या इंदापूर (Indapur) तालुक्यातील विद्यार्थिनींना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लिफ्ट दिली. त्यामुळे मुलींना एसटी बसऐवजी खासदार सुळे आणि आमदार दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांच्या गाडीतून प्रवास करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे सुळे यांनी स्वतः मुलींना सीटबेल्ट लावून पुढील सीटवर बसण्याची संधी दिली होती. इंदापूर तालुक्यातील गोखळी ते अंथुर्णे दरम्यानच्या प्रवासाने विद्यार्थिनी भारावून गेल्या हेात्या. (MP Supriya Sule gave a lift to the students waiting for the ST bus!)

खासदार सुप्रिया सुळे या शुक्रवारी (ता. १६ सप्टेंबर) इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. इंदापूर शहरातील कार्यक्रम संपल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचा गाड्यांचा ताफा बारामतीच्या दिशेने निघाला होता. गाेखळीच्या बस स्थानकावर एस.टी.बसची वाट पाहत काही विद्यार्थी थांबले होते. सुळे यांची गाडी पाहून मुलींनी सुप्रियाताईऽ सुप्रिया ताईऽऽ असा जोरात आवाज दिला. त्यामुळे खासदार सुळे यांच्यासह सर्व गाड्या बस स्थानकावर थांबल्या.

सुप्रिया सुळे यांनी मुलींशी गप्पा मारत काही प्रश्‍नही विचारले. तालुक्याचे आमदार कोण आहेत? असे विचारताच भरणेमामा असल्याचे उत्तर विद्यार्थिनींनी दिले. तुम्हाला कुठे जायचे आहे, हे विचारल्यानंतर मुलींनी अंथुर्णे, गोतोंडीमध्ये जायचे आहे, सांगितले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी ‘आमच्या गाडीत येणार का?’ असे विचारल्यानंतर मुलींच्या आनंद द्विगुणित झाला.

सुप्रिया सुळे यांनी मुलींनी पुढच्या सीटवर बसवून स्वतः सीटबेल्टही लावला. त्या स्वत: पाठीमागच्या सीटवर बसल्या. माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व कार्यकर्त्यांच्या गाडीमध्ये मुले बसले हेाते. मुली व मुलांना गोतोंडी आणि अंथुर्णेमध्ये सोडून ते आपल्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या.

दररोज एसटी बसने जाणाऱ्या मुलींना खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीत प्रवास करण्याची संधी मिळाली, त्याचा आनंद मुलींच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. आम्हाला ताईंच्या गाडीत प्रवास करताना आनंद झाल्याचे अंथुर्णे येथील दिया दादाराम शिंदे या मुलीने सांगितले. गाडीतून उतरल्यानंतर अभ्यास करण्याचा सल्लाही मुलींना सुळे यांनी दिला. या वेळी सुप्रिया सुळे यांच्या बरोबर माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ उपस्थित होते.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी या वेळी गोखळी, तरंगवाडीच्या स्थानकात एसटी बस थांबत नसल्याचे सांगितले. त्यानंतर माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी तातडीने डेपो मॅनेजरला फोन करुन सर्व बसस्थानकावर गाड्या थांबविण्याच्या सूचना दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT