Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या लाडक्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी, सुप्रिया सुळेंनी संतापत थेट पुरावाच दाखवला

Roshan More

Supriya Sule News :'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा शुभारंभ आज (शनिवारी) पुण्यातील बालेवाडी येथे होतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महायुतीला शक्तिप्रदर्शन करण्याची संधी देखील आहे.

मात्र, या कार्यक्रमासाठी महिलांनी उपस्थिती लावावी यासाठी त्यांचा लाडक्या बहीण योजनेचा फाॅर्म रद्द करण्याची धमकी दिल्याचे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. आपल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी धमकी देणाऱ्या व्हाॅट्सअप मेसेजचा स्क्रीन शाॅट देखील शेअर केला आहे.

'बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच.', असे चॅलेंजच ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.

नातं एवढं स्वस्त नसतं

गर्दी समजवण्यासाठी धमकी दिली जात असल्याचे म्हणत सुप्रिया सुळेंनी 'बहिण-भावाचं' नातं एवढं स्वस्त नसतं, या शब्दांत सरकारला सुनावले आहे. आपल्या ट्विटमध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला 'भाऊ' म्हणवितात आहेत... बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार... अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, 'बहिण-भावाचं' नातं एवढं स्वस्त नसतं.', असे सुळे यांनी म्हटले आहे.

व्हाॅटसअप मेसेजमध्ये नेमकं काय?

सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटरवरून हँडेलवरून व्हाॅट्सअप मेसेजचा स्क्रीन शाॅट शेअर केला आहे. या मेसेजमध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदाकरणाच्या अनुषंगाने शनिवारी दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडियम पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी ज्या महिलांनी हा फॉर्म भरला आहे व त्याचे approved मेसेज आला आहे त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहावे. यासाठी पुणे महानगरपालिकेने अहिल्याबाई होळकर बचत गट हॉल सुखसागर पोलिस चौकी येथून निघण्यासाठी बसची व्यवस्था केलेली आहे. तसेच अल्पोपहाराची पण व्यवस्था केलेली आहे. शनिवारी सकाळी 9.30 वाजता अहिल्यादेवी होळकर बचत गट हॉल पोलीस चौकी येथून बसची सोय केलेली आहे. या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. सर्वांनी येणे आवश्यक आहे. ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल.' असे लिहिल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT