Baramati Lok Sabha Election 2024 Sarkarnama
पुणे

Supriya Sule News: सुळेंनी मानले आंबेडकरांचे आभार; एकत्रित काम करण्याची दिली ग्वाही

Baramati Lok Sabha Election 2024: वसंत मोरे यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून तर मंगलदास बांदल यांना शिरूरमधून वंचितने उमेदवारी जाहीर केली आहे.

Chaitanya Machale

Pune New: महाविकास आघाडीबरोबर जागावाटपाबाबत सुरू असलेली चर्चा फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) लोकसभेसाठी उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे. 'वंचित'ने घेतलेल्या या भूमिकेमुळे राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघातील लढतींचे चित्र बदलणार आहे. वंचितने उमेदवार जाहीर केल्याने ज्या मतदारसंघामध्ये यापूर्वी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार होती तेथे आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे शहर या चार मतदारसंघांपैकी पुणे आणि शिरूर मतदारसंघात लोकसभेसाठी उमेदवार देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून तर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा प्रवास केलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल यांना शिरूरमधून वंचितने उमेदवारी जाहीर केली आहे. या दोन्ही मतदारसंघात यामुळे तिरंगी लढत होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामती लोकसभा मतदारसंघ मात्र वंचितने आपला उमेदवार उभा न करता विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. काही महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झालेले आणि उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा मिळवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजितदादा पवार आपली ताकद लावत आहेत.

बारामतीमध्ये वंचित महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितने प्रसिद्ध केलेल्या पत्रात सुळे यांना पाठिंबा जाहीर केल्याचे नमूद केले आहे. वंचितने घेतलेल्या या भूमिकेचे खासदार सुळे यांनी स्वागत केले असून, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे जाहीर आभार मानले आहेत.

खासदार सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून आंबेडकर यांचे आभार मानले आहेत. बारामतीमध्ये वंचितने उमेदवार न दिल्याने आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत होणार असून, बारामतीकर कोणाच्या बाजूने आपला कौल देणार हे निवडणुकीच्या निकालावरून निश्चित होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन विकास आघाडीने यापूर्वी 19 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यामध्ये आता आणखी पाच जागांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातून वसंत मोरे, शिरूरमधून मंगलदास बांदल यांच्यासह नांदेडमधून अविनाश बोसीकर, परभणीतून बाबासाहेब उगले, छत्रपती संभाजीनगरमधून अफसार खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ...

‘बारामती लोकसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माझ्याविरुद्ध उमेदवार न देण्याची भूमिका घेत पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे मनापासून आभार मानते. आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण सदैव एकत्रित काम करू ही ग्वाही देते. पुन्हा एकदा धन्यवाद’

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT