Mulshi Dam  sarkarnama
पुणे

Mulshi Dam Water : मुळशी धरणातील पाणी बोगद्याद्वारे सोलापूरकडे वळवणार, राज्य पातळीवर हालचाली! तत्त्वतः मान्यता

Mulshi Politics Rahul Kul : पूर्वेकडील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील दु्ष्काळग्रस्त भागात मुळशी धरणातून बोगद्याद्वारे पाणी पोहचण्याच्या राज्य पातळीवर हालचाली सुरू आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Pune News : मुळशी धरणातील पाणी सोलापूरच्या पूर्वेकडील दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याच्या दृष्टीने राज्य पातळीवर हालचाली सुरू आहेत. त्यासाठी पाचशे कोटींचा खर्च करून बोगदा बांधण्याचा पर्याय पुढे आला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्त्वतः मान्यता दिली असून, बोगद्याद्वारे मुळशी धरणातील पाणी मुळा-मुठा आणि भीमा नदी खोऱ्यात आणण्याचे नियोजित आहे.

बोगद्याच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळणे आणि त्याचे काम पूर्ण होण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे नदीपात्रातून थेट पाणी सोडण्यासाठीही प्रयत्न सुरू झाले असून, दौंडचे आमदार राहुल कुल यांनी यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे.

दरम्यान, बोगद्याद्वारे मुळशी धरणातील पाणी मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या खोऱ्यात आणण्याच्या प्रकल्पाचा खर्च कसा उभारावयाचा यावर चर्चा सुरू आहे. हा खर्च राज्य सरकार करणार की हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर)च्या माध्यमातून उभा करणार, असे दोन पर्याय आहेत. त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मुळशी धरणातील पाण्याचा वापर प्रामुख्याने वीजनिर्मितीसाठी केला जातो.

वीजनिर्मितीनंतर हे पाणी पश्‍चिमेकडे वाहून जाते. त्यामुळे पूर्वेकडील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागाला पाण्याचा लाभ मिळत नाही. वीजनिर्मितीसाठीच्या पाण्याचा विसर्ग कमी करून ते पाणी पूर्वेकडे वळविता येऊ शकते. त्याला तत्त्वतः मान्यता मिळाल्याची माहिती कुल यांनी दिली.

पाच टीएमसी पाणी उपलब्ध होणार

पूर्वेकडील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील अनेक गावांना सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. या प्रस्तावानुसार पाच टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT