Pune BJP: भाजपला 'पदवीधर'मध्ये धक्का! दिल्लीहून आलेल्या नेत्यानं झाडाझडती टाळली, पण कान टोचले; म्हणाले,'आलिशान गाड्या अन् महागडे मोबाईल...'

MLC Graduate Election 2026: विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. पुणे महापालिकेवर एकहाती सत्ता, खासदार,आमदारांचं मोठं पाठबळ असूनही पदवीधरच्या निवडणुकीत झालेला भाजपचा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे.
Maharashtra MLC Election
Maharashtra MLC Election Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. पुणे महापालिकेवर एकहाती सत्ता, खासदार,आमदारांचं मोठं पाठबळ असूनही पदवीधरच्या निवडणुकीत झालेला भाजपचा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. यानंतर भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून तातडीनं दिल्लीतील नेत्याला पुण्याकडे धाडले होते. त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये धाकधूक होती. पुण्यातील बैठकीत भाजप नगरसेवकांची झाडाझडती टळली, पण दिल्लीहून आलेल्या नेत्यानं कान टोचल्याचं दिसून आलं.

‘‘नगरसेवक म्हणून निवडून येऊन १० महिने झाले, या काळात तुम्ही नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन किती कामे केली. आलिशान गाड्या, महागडे मोबाईल घेऊन लोकांमध्ये जाता पण लोक तुमच्याबद्दल काय विचार करत आहेत हे महत्त्वाचे आहे. प्रभागातील चार नगरसेवकांनी महिन्यातून एकदा एकत्र येऊन संवाद साधला पाहिजे. लोकांची सेवा करा, पक्षाला मोठे करा, असे मार्गदर्शन भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांनी केले.

भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांनी शुक्रवारी (ता. ३०) भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत पुणे महानगरपालिकेतील नगरसेवकांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी नगरसेवकांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महापौर मंजुषा नागपुरे, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

बी. एल. संतोष या बैठकीत म्हणाले, पुणे महापालिकेत भाजपचे १२६ नगरसेवक आहेत, स्पष्ट बहुमत असले तरी आपण कशा पद्धतीने काम करतो हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक कामासाठी निधी आवश्‍यक असतो, पण कधीकधी निधीची गरज नसते तर तुमच्या इच्छाशक्तीने लोकांची छोटी कामे होतात. त्यामुळे त्यांच्या अशा कामांना प्रतिसाद द्या. सकाळी सहा ते रात्री १२ या वेळेत नागरिकांसाठी उपलब्ध राहिले पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

Maharashtra MLC Election
Gokul News: एकीकडे सतेज पाटील - मुश्रीफांची अध्यक्षपदावरुन भांडणं, दुसरीकडे 'गोकुळ'नं शेतकऱ्यांना दिली आनंदाची बातमी

काम करताना कोणी दुखावले गेले असेल त्याबद्दल आत्मपरीक्षण करा, त्यांच्याशी बोलून सोबत घ्या. १२६ नगरसेवक असल्यानं सर्वच जण सभागृहनेत्यांना सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन काम करणं अवघड होऊ शकते. त्यामुळे १५-२० नगरसेवकांचा गट तयार करावा, त्यात अनुभवी नगरसेवकाने चर्चा करून त्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांशी बोलावे, असा सल्ला संतोष यांनी दिला.

कौटुंबिक परिस्थितीवर चर्चा

या बैठकीत बी. एल. संतोष यांनी भाजपच्या नगरसेवकांच्या कौटुंबीक परिस्थितीवर चर्चा केली. ज्या नगरसेविकांना लहान मुले आहेत, त्या काम कसे करतात, त्यावेळी नगरसेविका भावूक झाल्या. आम्ही मुलांना वेळ देऊ शकत नाही, घरातून बाहेर पडताना मुले रडायची पण सासू-सासरे त्यांना सांभाळतात असे त्यांनी सांगितले.

Maharashtra MLC Election
Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महत्त्वाची अपडेट; अर्ज बाद झालेल्या 13 उमेदवारांना दुसरा मोठा धक्का

तसेच यावेळी संतोष यांनी तुम्ही पूर्णवेळ घराच्या बाहेर असता अशा वेळी कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका, मुलांच्या अभ्यासाकडेही लक्ष द्या. आठवड्यातून एक दिवस कुटुंबाला दिला पाहिजे अशी सूचना केली. यावेळी अनेक नगरसेवकांनी त्यांची मने मोकळी केली. पक्षातर्फे प्रथमच अशा प्रेमळ बैठकीमुळे नगरसेवक सुखावले होते.

झाडाझडती न झाल्यानं सुखावले

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाल्यानंतर दोन दिवसांनंतर थेट राष्ट्रीय महासचिव पुण्यात आले. ते नगरसेवकांची बैठक घेणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे काही नगरसेवक त्यांच्या प्रभागात किती मतदान झाले याची माहिती घेऊन बैठकीला गेले होते. पण बी. एल. संतोष यांनी पदवीधर निवडणुकीचा उल्लेखही न केल्याने सर्वांनी सुटकेचा निश्‍वास टाकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.