Madhuri Misal letter to Pune Municipal Commissioner Sarkarnama
पुणे

Madhuri Misal : 'माझी प्रतिमा मलीन झाली, मानहानीचा खुलासा करा'; भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळांचे पुणे महापालिका आयुक्तांना पत्र

BJP minister Madhuri Misal defamation issue: 'पर्वती मतदारसंघातील विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार प्रशासकांनी स्थायी समितीत वित्तीय आणि प्रशासकीय मंजुरी दिल्याचे नोंदीत दिसते. कलम ७२ (ब) नुसार पुढील अंदाजपत्रकात तरतूद ठेवणे हे प्रशासन व मुख्य सभेवर कायदेशीर बंधन आहे.'

Sudesh Mitkar

Pune News, 25 Feb : पुणे महापालिकेमध्ये भाजपने बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये घडलेल्या एका प्रसंगामुळे भाजपच्या राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ या व्यथित झाल्या असून त्याबाबतचा खुलासा त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे मागितला आहे. याबाबत त्यांनी भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांना देखील तसे पत्र दिले आहे.

पर्वती मतदारसंघातील २१ विकास कामांसाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ७२ (ब) नुसार स्थायी समितीत मंजूर झालेला प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या उंबरठ्यावरूनच मागे घेण्यात आल्याने प्रशासनावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी संताप व्यक्त केला आहे. 'लोकप्रतिनिधी म्हणून विकासाचा पाठपुरावा करणे माझे कर्तव्य, मग प्रस्ताव मागे का?' असा सवाल करीत त्यांनी आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे खुलाशाची मागणी केली आहे.

मिसाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'पर्वती मतदारसंघातील विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार प्रशासकांनी स्थायी समितीत वित्तीय आणि प्रशासकीय मंजुरी दिल्याचे नोंदीत दिसते.

कलम ७२ (ब) नुसार पुढील अंदाजपत्रकात तरतूद ठेवणे हे प्रशासन व मुख्य सभेवर कायदेशीर बंधन आहे. वर्षअखेर तरतूद कमी पडल्यास प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी या तरतुदीचा वापर करण्याची परंपराच आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, माध्यमांनी विचारणा केल्यानंतर 'आयुक्तांनी प्रस्ताव मागे घेणार, असे संकेत दिले आणि सभेच्या आदल्या दिवशी नगर सचिव विभागाला पत्र देत तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी प्रस्ताव माघारी घेतल्याचे कळविण्यात आले. कोणत्या तांत्रिक त्रुटी? आणि माझ्याशी साधी चर्चा का नाही?' असा सवाल मिसाळ यांनी केला आहे. यामुळे आपली मानहानी झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

'या कार्यपत्रिकेत दुसऱ्या आमदाराच्या मतदारसंघातील ७२ (ब) चा प्रस्ताव कायम ठेवला गेला. मात्र, पर्वतीतील कामांचा प्रस्तावच मागे घेतला गेला,' असा आरोप करीत मिसाळ यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करीत, 'कोणत्या अधिकारात हा निर्णय?' असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने आपली प्रतिमा मलीन झाली आहे.या बातम्यांमुळे आपण व्यथित झालो असल्याचा देखील या पत्रात राज्यमंत्री यांनी सांगितला आहे.

भाजपची चुप्पी, विरोधकांची टोलेबाजी

माधुरी मिसाळ यांचा प्रस्ताव १८ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत नगर सचिवांनी प्रस्ताव मागे घेतल्याची घोषणा केली तेव्हा सत्ताधारी गटातून कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही. यावर सर्वांनी चुप्पी साधली त्या उलट काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सभागृह नेते गणेश बीडकर यांना चिमटा काढत, 'तुमच्या मंत्र्यांचा प्रस्ताव मागे घेतला जातोय आणि तुम्ही गप्प?' असा सवाल उपस्थित केला. पर्वतीच्या विकासकामांवरून आता राजकीय वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. पुढील सर्वसाधारण सभेत हा मुद्दा गाजणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT