Nana Bhangire Sarkarnama
पुणे

Pune Politics : फुकटचे श्रेय घेणाऱ्यांना करारा जबाब मिलेगा ! भानगिरेंचा कोणाला सूचक इशारा

Nana Bhangire Vs Chetan Tupe : अडीच वर्षे त्यांचे मुख्यमंत्री असताना तुम्हाला एकही रुपया आणता आला नाही. आता आम्ही कामे करतोय तर त्याचे श्रेय घेता.

Chaitanya Machale

Pune Political News : राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा देत अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाले. यापुढील काळात शिंदे-फडणवीस यांच्या मदतीने आगामी निवडणुका लढविण्याचा निर्धार करत राज्यात आम्ही सर्व एक आहोत असे या तिन्ही नेत्यांकडून स्पष्ट केले जात आहे. मात्र स्थानिक पातळीवर आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली नसल्याचे चित्र आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या विकासकामांच्या श्रेयावरून आता मुख्यमंत्री शिंदेंचे समर्थक आणि शहर प्रमुख नाना भानगिरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. (Pune Politics)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना हडपसर मतदारसंघात एक रुपयाही निधी न आणणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर तीनशे कोटी रुपयांचा निधी राज्य शासन व पुणे महापालिकेच्या माध्यमातून हडपसर विधानसभा मतदारसंघात आणला. या निधीतून डीपी रस्ते व अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. या विकासकामांमधून हडपसर परिसर व महंमदवाडी परिसराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. असे सांगतानाच 'न केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेणाऱ्यांना करारा जबाब मिलेगा' असा सूचक इशारा नाना भानगिरे (Nana Bhangire) यांनी कोणाचेही नाव न घेता दिला आहे. भानगिरे यांनी दिलेल्या थेट इशाऱ्यामुळे त्यांचा आरोप हा या मतदारसंघातील आमदार यांच्याकडेच असावा अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

हडपसर (Hadapsar) विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी भानगिरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी आक्रमक भूमिका मांडत. न केलेल्या कामाचे श्रेय घेणाऱ्यांना चांगलेच सुनावले. भानगिरे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर समर्थक समजले जात असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ते हडपसरमधून इच्छुक आहेत. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून ते विशेष प्रयत्नशील असून वेगवेगळ्या माध्यमातून राज्य सरकारकडून निधी आणत आहेत. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर घुले, उपशहर प्रमुख संतोष रजपूत, विकी माने, विभागप्रमुख अभिमन्यू भानगिरे, महिला उपशहरप्रमुख स्मिता साबळे, जहीर भाई, सविता सोलखे उपस्थित होते.

हडपसरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी तीन उड्डाणपूल पाडून फातिमानगरपासून एकच मोठा उड्डाणपूल व्हावा, मेट्रोचे काम लवकर व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून निवेदन दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पाठपुरावा करून येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. हडपसरमधील वाढती गुन्हेगारी व पोलिसांचे संख्याबळ लक्षात घेता येथे आणखी दोन पोलिस स्टेशन व्हावेत म्हणून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे भानगिरे म्हणाले.

हडपसर मतदारसंघात जोरदार कामे सुरू आहेत. आम्ही कामे करतो मात्र दुसरे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात. अडीच वर्षे त्यांचे मुख्यमंत्री असताना तुम्हाला एकही रुपया आणता आला नाही. आता आम्ही कामे करतोय तर त्याचे श्रेय घेता. हे चालणार नाही. जे कोणी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा भानगिरे यांनी दिला आहे. या मतदारसंघासाठी आमदार चेतन तुपे यांच्यासह आता नाना भानगिरे हे देखील इच्छुक असल्याने येणाऱ्या काळात श्रेयवादाची ही लढाई अधिकच वाढण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT