Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar: काय असेल राष्ट्रवादीतील इन्कमिंग बाबतचे धोरण, शरद पवारांनी स्पष्ट सांगितले

Maharashtra Assembly Election Sharad Pawar: सध्या मला रोज दोन ते तीन तास पक्षांमध्ये येऊ इच्छिणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी काढावे लागतात. पिंपरी चिंचवड मधील काही माजी नगरसेवकांनी माझी भेट घेतली आहे.

Sudesh Mitkar

Pune News: लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये (Sharad Pawar) येण्यासाठी अनेकजण इच्छुक असलेल्या बातम्या सातत्याने येत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांसोबत असलेले अनेक नेते आता शरद पवारांच्या सोबत येण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. मात्र या इनकमिंग बाबत पक्षाच्या अंतर्गत दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत.

ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहणं पसंत केलं त्यांचा प्रथम विचार करून नंतरच पक्षात येणाऱ्या संधी द्या, असा कुठेतरी सूर पक्षात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षप्रवेशाबाबत महत्त्वाची भूमिका घेतली आहे.

शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार हे यंदा पालखी सोबत चालणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. याबाबत विचारला असता ते म्हणाले, "या बातम्यांमध्ये कसलंही तथ्य नाही. वारी पंढरपूरला जात असताना ती आमच्या गावावरून जाते. त्यावेळी वारीच्या स्वागताला एक दिवस उपस्थित राहण्याचा माझा मानस आहे. त्यांचे स्वागत करून संपूर्ण व्यवस्था लावून वारी पुढे जाईल परंतु वारीच्या प्रवासात मी कुठेही असणार नाही. परंतु त्यांच्या स्वागताला उपस्थित राहील, असे स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं.

पक्षांमध्ये येण्यासाठी शरद पवार यांच्यात रोज नवनवीन नेते भेटी घेत आहेत. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले,'सध्या मला रोज दोन ते तीन तास पक्षांमध्ये येऊ इच्छिणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी काढावे लागतात. पिंपरी चिंचवड मधील काही माजी नगरसेवकांनी माझी भेट घेतली आहे. आजही काही लोक भेट घेणार आहेत. याचा मला आनंद आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहून असं त्यांना वाटत आहे. जे काही पूर्वी निर्णय घेतले ते हिताचे नव्हते या निष्कर्षापर्यंत आता ते लोक पोचू लागले आहेत. पक्षांमध्ये येणाऱ्यांचा आम्ही स्वागत करू, असे पवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्याकडे कोणत्या जागा येणार आहेत, याबाबत सुरुवातीला चाचपणी करू आणि नंतर तरुण पिढीला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेऊ, असे पवार म्हणाले. महाराष्ट्र सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, या घोषणा करताना तुमच्या खिशात काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. ते न पाहताच बाजारात गेला तर फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने जो निकाल दिला, त्यामुळे कुठेतरी सरकारने धसका घेतला आहे. त्या मधून अशा लोकप्रिय घोषणा करण्यात येत आहेत. थोडाच दिवसांमध्ये वस्तुस्थिती काय आहे. हे त्यांना समजेल असा खोचक टोला शरद पवार यांनी सरकारला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT