Chandrakant Patil
Chandrakant Patil  Sarkarnama
पुणे

चंद्रकांतदादांचा पुण्यात राष्ट्रवादीसह मनसेला दे धक्का!

सरकारनामा ब्युरो

पुणे : पुणे महापालिकेच्या (PMC) आगामी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापलं आहे. याचबरोबर राजकीय फोडाफोडीलाही वेग आला आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) धक्का दिला आहे. राष्ट्रवादी आणि मनसेच्या दोन नेत्यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

चंद्रकांत पाटील आणि महापालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक उपाध्यक्ष आनंद शेजवळ आणि मनसे प्रभाग क्रमांक सोळाचे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. चंद्रकांत पाटील यांनी या त्यांचे पक्षात स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम असल्याचं मला सांगण्यात आलं. एखाद्या हॉलमध्ये कार्यक्रम असेल आणि 50 लोक असतील असं मला वाटलं होत. पण संख्या बघून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली असं वाटू लागलं आहे. गणेश बीडकर आणि भाजपच्या प्रेमापोटी एवढ्या मोठ्या संख्येने हे लोक आले आहेत. हा प्रवेशाचा मोठा कार्यक्रम होतोय. दोन तरुण कार्यकर्त्यांना लवकर कळालं की राजकीय पक्षात काम करायचं असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही.

या वेळी चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी हा केवळ एका माणसाचा पक्ष आहे. त्यांनी सांगितलं की रांगेत बसायचं. पक्षाचा प्रमुख देईल ते त्यांच्याकडून घ्यायचं. त्यांनी आयुष्य घालवलं पक्ष उभं करायला त्यामुळं त्यांचं ऐकल तर चालेल. पण आता त्यांच्या कन्या आल्या आहेत, त्या खूप तापट आहे. त्या म्हणतात हा माझ्या वडिलांचा पक्ष आहे. मी कोणाचंच नाव घेत नाही. त्यामुळं माझ्यावर कुणीही खटला दाखल करू शकत नाही.

दुसरा एक पक्ष असा आहे की ज्यामध्ये आजोबा आणि वडिलांनी खूप काम केलं. आता त्यांच्याकडं खुर्चीसाठी काहीही सुरू आहे. आता या पक्षांची नावे घेण्यास वेळ नाही. त्यामुळे या पक्षात भवितव्य नसल्याने अनेक जण भाजपमध्ये येत आहेत. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे. माझी आई सरपंच नव्हती आणि माझे वडील जिल्हा परिषद सदस्य नव्हते. असे असतानाही आमचे सरकार असताना मी 8 खात्यांचा मंत्री होतो. हे केवळ भाजपमध्येच घडते, असे पाटील यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT