Pimpri: अजित पवार यांचा बालेकिल्ला पिंपरी-चिंचवडमधील त्यांच्या विश्वासातील चार माजी नगरसेवकांनी गेल्या महिन्याच्या २५ तारखेला भाजपचे आमदार असलेला शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ पक्षाकडे घेत तेथे नवीन उमेदवार देण्याची मागणी केली. नाही, तर तुतारी फुंकू,असा इशारा दिला.
त्यानंतर चार दिवसांत त्यांच्याच पक्षाचे शहरातील ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनीही बंडाचा इशारा दिला. दोन्ही बंडातील नाराजांनी जाहीर केलेली चिंचवड विधानसभेची उमेदवारी ही वरकरणी असली, तरी त्यामागे त्यांचा हेतू दुसराच असल्याची चर्चा आहे.
दोन्ही बंडखोर गटांनी त्यांच्या चिंचवड विधानसभेत त्यांनाच आगामी विधानसभेला तिकिट मिळावे, अशी मागणी केली आहे. भोईर हे आमदारकीसाठी तीव्र इच्छूक आहेत. मात्र, त्यांना वारंवार डावलण्यात आले आहे. त्यामुळे अखेर त्यांनी चिंचवड कसेही लढण्याचे ठरवले आहे. तर, बंडाचा झेंडा रोवत थेट अजितदादांनाच आव्हान दिलेल्या माजी नगरसेवकांनीही चिंचवडला नवा चेहरा देण्याची मागणी केली आहे. ती मान्य झाली नाही, तर तुतारी फुंकू, असा इशारा त्यांनीही दिला आहे. या बंडात आपल्याला पक्षातीलच नाही,तर भाजपच्या सुद्धा काही नाराज माजी नगरसेवकांची साथ असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
लोकसभेनंतर महाराष्ट्रात अजितदादांच्या गटालाच नाही, तर महायुतीलाही मोठा फटका बसला.त्यामुळे विधानसभेला प्रतिमा सावरण्यासाठी त्यांनी निकराने प्रयत्न सुरु आहेत.त्यात त्यांचे काही आजी,माजी लोकप्रतिनिधी पक्ष सोडू लागल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. चिंचवडमधील अजितदादांच्या पक्षातील दोन बंडांनी त्यांचेच नाही,तर भाजपचे सुद्धा टेन्शन वाढवले आहे.कारण तेथे त्यांचा आमदार आहे. तेथील निकाल फिरवू शकतील एवढी मते या दोन्ही बंडातील नेत्यांच्या मागे आहेत. त्यामुळे मित्रपक्षातील हे बंड शमले नाही तर भाजपला तेथे फटका बसू शकतो.त्यामुळे अजितदादांमार्फत ते यावर तोडगा काढणार, यात शंका नाही.
भोईर यांची आमदार व्हायची एकच मनिषा आहे. त्यातूनच त्यांनी विधानसभेला चिंचवडवर दावा केला आहे. परंतू, त्यांना विधानपरिषदेवर घेतले,तरी त्यांनी आमदारकीसाठी उपसलेली तलवार म्यान होणार आहे. दरम्यान,उद्योगनगरीतून त्यातही पिंपरी या एकाच विधानसभा मतदारसंघातून दोघांना भाजपने विधानपरिषदेवर संधी दिली आहे. त्यामुळे आता शहरातून एकाला तेथे घ्यावे, अशी मागणी अजित पवार राष्ट्रवादीतून होऊ लागली आहे. राज्यपाल नियुक्त १२ सदस्य विधानपरिषदेवर घेतले जाणार असून त्यात हा बॅकलॉग भरून काढावा, अशी त्यांची मागणी आहे. तेथे संधी मिळावी,हा भोईरांचा खरा हेतू आहे. त्यासाठी त्यांनी विधानसभेकरिता चिंचवडमधून उमेदवारी मिळण्यासाठी बंडाचा झेंडा फडकावला आहे.
चिंचवडमधील दुसरे बंड हे अजितदादांच्या अत्यंत विश्वासू माजी नगरसेवकांचे आहे. त्यामुळे त्यांनी अजितदादांनाच आव्हान कसे दिले, याबाबत चिंचवडच नाही,तर शहरातही चर्चा आहे. त्यांची चिंचवडमध्ये नवा चेहरा देण्याची मागणी आहे. म्हणजे यातूनअप्रत्यक्षपणे त्यांनी तेथील महायुतीतील जगताप कुटुंबातील भाजपच्या संभाव्य उमेदवारीलाआणि आघाडीकडून तेथे तिकिट मागणारे नाना काटे, राहूल कलाटे यांनाही विरोध केला आहे.
विद्यमान आमदार अश्विनी जगताप आणि त्यांचे दीर शंकर जगताप यांना कोलदांडा घालण्याचा त्यांचा अंतस्थ हेतू आहे. तसेच लढून हरणार काटे आणि कलाटे यांनाही तिकिट मिळू नये,असे त्यांच्या नव्या चेहरा द्या,या मागणीतून दिसून येत आहे. कलाटे चिंचवडमधून तीनदा, तर काटे दोनदा हरलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी दुसरा, मग तो आपल्या गटातील नाही,दिला,तरी या बंडखोरांना चालणार आहे.
भाजप आमदार असलेल्या या जागेवर दावा करण्यातून त्यांचा भाजपमधील जगतापांच्या घराणेशाहीला विरोधही स्पष्ट झाला आहे. एकूणच त्यांचेच नाही, तर भोईरांचेही बंड म्हणजे कही पे निगाहे,कही पे इशारा, असेच म्हणावे लागेल. पण, अजितदादा आपल्या पक्षाची ढासळती प्रतिमा सावरण्यासाठी नाराज चार बंडखोर माजी नगरसेवकांना पिंपरी महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष (सभापती), महापौर बनविण्याचे आमिष दाखवून आणि भोईरांना विधानपरिषद देण्याचे आश्वासन देत त्यांचे बंड शमवतील, असा अंदाज आहे. पण, हे आमिष हे दोन्ही बंडातील बंडखोर मानणार की धुडकावणार हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.