Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पुणे

पिंपरी-चिंचवडची जबाबदारी मिळताच अजितदादांनी लावला कामाचा धडाका!

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे गुरुवारी (ता. २ जून) पक्षाने म्हणजे खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोपविली अन त्यांनी आज (ता. ३ जून) लगेचच पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन १३ विकास कामांची भूमिपूजने आणि उद्‌घाटनाचा धडाका लावला. दुपारी ते पालिका निवडणूक तयारीसाठी पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. दरम्यान, आजच्या लोकार्पण सोहळ्यात शहर पोलिसांना पेट्रोलिंगकरिता पन्नास स्मार्ट बाईक त्यांच्या हस्ते देण्यात आल्या. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात चावी घेण्यासाठी आलेले पोलिस उपायुक्त (मुख्यालय) डॉ. काकासाहेब डोळे यांच्याकडे पाहून त्यांना बारीक होण्याचा सल्लाही पवारांनी दिला. (NCP give responsibility of Pimpri Chinchwad Corporation election to Ajit Pawar)

अजित पवार यांच्या सल्ल्याच्या निमित्ताने पोलिसांच्या नाही, तर अधिकाऱ्यांच्या फिटनेसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्याबद्दल पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. तसेच, तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात पोलिस फिटनेसची योजना राबविण्यात आली होती, याकडेही त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. यामुळे पोलिसांच्या तंदुरुस्तीकरिता आयुक्त नव्याने आदेश नवे जारी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीचे सर्वाधिक तंदुरुस्त आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पोलिस फिट राहण्यासाठी त्यांना सायकली व स्मार्ट वॉच दिली होती.

सकाळी साडेसात वाजता पहिलाच कार्यक्रम हा पन्नास स्मार्ट बाईक वितरणाचा होता. पिंपरी महापालिकेने ५१ लाख रुपये खर्चून पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांना या बाईक दिल्या आहेत. महापालिका मुख्यालयात झालेल्या या वितरण सोहळ्याला पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी या बाईकची प्रातिनिधीक स्वरूपात चावी घेण्यासाठी डीसीपी डॉ. डोळे हे गेले. तेव्हा त्यांच्या प्रकृतीकडे पाहून अजितदादांनी त्यांना थोडं बारीक व्हा,असा प्रेमळ सल्ला दिला. या वेळी त्यांच्या हस्ते पालिकेतील उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर, ग्रीन मार्शल पथकाला ई-चलन उपकरण आणि अग्निशमन दलाकडे ८१ लाख रुपयांच्या सहा फायटर मोटार सायकल सुपूर्त करण्यात आल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT