Pimpri-Chinchwad News : यावर्षी दोन जुलैला राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कथित बंड आणि फुटीनंतर अजित पवार गट हा भाजप-शिंदे शिवसेनेच्या सरकारमध्ये सामील झाला. दुसरीकडे या फूट तथा बंडाबाबत नेमकी भूमिका राष्ट्रवादीच्या दोन्ही गट आणि त्यांच्या प्रमुखांनीही स्पष्ट न केल्याने जिल्हा पातळीवरील दोन्ही गटांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अद्याप गोंधळलेले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडला शरद पवार (Sharad Pawar) गटाला अद्याप अध्यक्ष मिळालेला नाही.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणूक ध्यानात घेऊन तालेवार व्यक्ती अध्यक्ष म्हणून उद्योगनगरीला नेमण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची भूमिका अद्याप गोंधळाची असल्याने या पदी नियुक्ती करून घेण्यास काहीजण कचरत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) म्हणजे सत्तेच्या विरोधात जाऊन हे धाडसी पाऊल उचलून त्यांचा सामना करण्यास या पदासाठीचे इच्छुक धजावत नसल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भविष्यात दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता गृहित धरून आपल्या पायावर धोंडा मारून घेणेही काहींना नको वाटते आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात १७ तारखेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्थापन केलेली नऊजणांची कार्यकारी समितीच काम पाहत आहे. आगामी पालिका निवडणुकीत प्रभाव पाडेल असा अनुभवी व्यक्ती अध्यक्ष देण्याच्या विचारातून तरुण टीम असलेल्या कार्यकारी समितीतील कोणी अध्यक्ष म्हणून नियुक्त केला जाणार नाही. त्याला समितीतीलच दोघांनी 'सरकारनामा' शी बोलताना दुजोरा दिला.
दरम्यान, शरद पवार राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महिला शहराध्यक्षपदी ज्योती निंबाळकर आणि विद्यार्थी सेल शहराध्यक्षपदी राहूल आहेर यांची नुकतीच नेमणूक झाली. त्यानंतर आता शहराध्यक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. अजित पवार राष्ट्रवादी गटाचे शहराध्यक्ष हे भोसरीतील अजित गव्हाणे आहेत. पूर्वीच्या एकसंध राष्ट्रवादीचेही तेच अध्यक्ष होते. त्यामुळे शरद पवार गटही भोसरीतील व्यक्ती शहराध्यक्ष म्हणून देण्याची खेळी करण्याची शक्यता आहे.
त्यासाठी तेथील एका माजी नगरसेवकाचे नाव चर्चेत आहे. इतरही दोन नावे त्यासाठी घेतली जात आहेत. पण, वरील कारणामुळे सगळ्यांनीच सध्या तळ्यातमळ्यात अशी भूमिका घेतलेली आहे. तर, दुसरीकडे येत्या आठ दिवसात शहराला अध्यक्ष मिळेल, असे शहर कार्यकारी समितीतील सदस्य सुनील गव्हाणे यांनी 'सरकारनामा'ला रविवारी (ता.२७) सांगितले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.