Sanjog Waghere, Ajit Pawar
Sanjog Waghere, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

पावसाळ्यातील निवडणुकीसाठीही राष्ट्रवादीची तयारी

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : राज्यातील महापालिकांसह (Municipal Corporation Election) सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीवर (Local Body Election) सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालाची टांगती तलवार आहे. दुसरीकडे प्रशासक नियुक्त महापालिकांसह ग्रामपंचायतीच्याही निवडणुका पावसाळ्यात घेण्याची तयारी राज्य निवडणूक आय़ोगाने दर्शवली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता आणण्याचा चंग बांधलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) पावसाळ्यात होऊ घातलेल्या निवडणुकीची तयारी आयोगाच्या जोडीने आता सुरु केली आहे. त्यासाठी ते शहराकरिता नवी टीम येत्या सोमवारी (ता.२ मे) जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. ती सर्वसमावेशक असेल, असा अंदाज आहे.

अध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण केलेल्या काहीशा नेमस्त संजोग वाघेरे-पाटील यांच्या जागी राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवडची धुरा यावर्षी १२ फेब्रुवारीला आक्रमक अशा तरुण अजित गव्हाणे यांच्याकडे सोपवली. त्यानंतर पक्षाने काहीशी कात टाकली. तो पुन्हा एकजुटीने आक्रमक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयातील ४ मे च्या सुनावणीत, जर निवडणूक घेण्याचा आदेश आला, तर ती लगेच होऊ शकते. त्यामुळे कॅप्टन गव्हाणे यांच्या टीमला लगेच खेळाडू देण्याचे (शहर कार्यकारिणी) राष्ट्रवादीने आता ठरवले आहे. गव्हाणे यांनी आपली टीम तयार केली असून ही नावे ते दोन दिवसांत ते अजित पवार यांच्याकडे देणार आहेत. त्यानंतर सोमवारीच ही नवी शहर कार्यकारिणी जाहीर होईल, अशी दाट शक्यता आहे. ती सर्वसमावेशक असेल, म्हणजे गव्हाणेंबरोबर महिला आणि युवक शहराध्यक्ष देताना पक्षाने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविला, तसाच तो कार्यकारिणी निवडीतही असेल, असा होरा आहे.

यापूर्वीच्या कार्यकारिणीत मराठा समाजाचेच प्राबल्य होते. म्हणून त्याला आक्षेप घेण्यात आला होता. म्हणून पक्षाने नवा शहराध्यक्ष (गव्हाणे) हा मराठा दिला. माळी समाजातील कविता आल्हाट यांना महिला शहराध्यक्ष करण्यात आले. तर, इम्रान शेख या मुस्लिम समाजातील युवकाला युवक शहराध्यक्ष दिले गेले. हा ट्रेंड शहर कार्यकारिणीतही कायम ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार असल्याचे एका प्रमुख जबाबदार शहर पदाधिकाऱ्य़ाने आज (ता.28 एप्रिल) 'सरकारनामा'ला सांगितले. त्याला दुजोरा फजल शेख यांच्या आजच्या नियुक्तीतून मिळाला.

पूर्वीच्या कार्यकारिणीत प्रवक्ते असलेल्या फजल शेख यांना आज मुंबईत अजित पवार यांनी शहर कार्याध्यक्षपदाचे पत्र दिले. यापूर्वी शहरात गव्हाणेंबरोबर त्यांच्या मदतीला शहरातील पिंपरी (जगदीश शेट्टी), चिंचवड (प्रशांत शितोळे) आणि भोसरी (राहूल भोसले) अशा तिन्ही विधानसभा मतदारसंघातून एकेक कार्याध्यक्ष देण्यात आले होते. आता शेख यांच्या रुपाने ही संख्या आता चार झाली आहे. त्यांच्याकडे विशेष कामगिरी दिली जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT