Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama
पुणे

एकनाथ खडसेंनी दुपारचे भोजन केले मानसकन्येच्या घरी..

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे गुरुवारी (ता.३ फेब्रुवारी) राष्ट्रवादीच प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) दौऱ्यावर आले होते. त्यामुळे शहरात मूळचे खान्देशवासीयांनी मोठी गर्दी केली होती. पिंपरी-चिंचवड शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यातही महापालिका निवडणुकीच्या (Pcmc Election-2022) तोंडावर त्यांच्या या दौऱ्याकने अनेकांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांचे जुन्या भाजपमधील समर्थकांनीही त्यांच्या भेटी घेतल्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपल्या मानसकन्येच्या घरी म्हणजे राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्या शहराध्यक्षा सारिका पवार यांच्या घरी दुपारचेे खादेंशी पद्धतीने बनवलेले जेवण केले.

भाजप सोडल्यावर पहिल्यांदाच नाथाभाऊ हे उद्योगनगरीत आले होते. त्यात पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा झाल्याने त्याला वेगळे महत्व प्राप्त झाले होते. खडसेंचे शहरातील एकेकाळचे कट्टर समर्थक खान्देशवासी भाजपचे सभागृहनेते नामदेव ढाके तसेच, माजी सभागृहनेते तथा नगरसेवक एकनाथ पवार यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतल्याने याची शहरात मोठी चर्चाही झाली. यानंतर त्यांनी दुपारचे भोजन आपली मानसकन्या व राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्या शहराध्यक्षा सारिका पवार यांच्या घरी केले. खडसेंसाठी खास त्यांच्या आवडीची पातोड्याची भाजी व इतर खान्देशी पदार्थ असा मेन्यू ठेवण्यात आला होता. खडसेंनी भाजप सोडल्यानंतर त्यावेळी भाजपच्या ओबीसी सेलच्या शहराध्यक्षा असलेल्या पवार यांनीही कमळ सोडून हातावर घड्याळ बांधले होते. शहर दौऱ्यात त्यांच्याच घरी खडसेंनी जेवण करणे पसंत केले. मात्र, भाजपच्या नेत्यांनी खडसे यांची भेटी घेतल्यावरून राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलेच शाब्दीक यूद्ध ही रंगले होते.

भाजपवर टीका करतांना खडसे म्हणाले, गेल्या पाच वर्षात भाजपची पिंपरी पालिकेत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली. त्यांच्या स्थायी समिती सभापती तथा अध्यक्षांना लाचखोरीत अटक झाली. तर, नुकतेच त्यांचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक केशव घोळवे हे फसवणूक व खंडणीच्या गुन्ह्यात पकडले गेले. हे अटक होणे चांगले नाही. त्यातून शहराची बदनामी झाली आहे. परिणामी भाजपला सत्तेतून दूर करणे आवश्यक बनले आहे, असे खडसे म्हणाले. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या या भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरत जनतेसमोर मांडणार आहे. पिंपरीतील हा भ्रष्टाचार हा भाजपच्या वरिष्ठांचा आशिर्वाद असल्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे त्याची व टेंडर प्रक्रियेची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ज्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आऱोप झाले, तेच आज भाजपमध्ये पदावर आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, गोल्डमॅन आणि युवक राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी प्रशांत सकपाळ यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केल्यानंतर त्यांनी पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयालाही भेट दिली.यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवडकर खान्देशवासियांशी चर्चा केली. आता आपल्याला राष्ट्रवादीचे काम करायचे आहे, असे त्यांना खडसेंनी सांगितले. भाजपचे पवार यांनी नाथाभाऊंना आपल्याकडे चहाला बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. तर, खडसे उतरलेल्या हॉटेलवर जाऊन त्यांची ढाकेंनी भेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT