Ajit Pawar, Ajit Gavane sarkarnama
पुणे

PCMC : अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहेत

सरकारनामा ब्यूरो

Pimpri-Chinchwad पिंपरी : तीनऐवजी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने महापालिका निवडणूक घेण्याचा निर्णय काल राज्य मंत्रीमंडळाने घेतल्याने ही निवडणूक काही महिने पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) त्यासाठी आतापासून तयारीत आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेतील सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरु आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे शनिवारी (ता.६) शहरात येत आहेत.

उपमुख्यमंत्री असताना पालिका निवडणुकीच्या तयारीसाठी पवार पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन गेले होते. दरम्यान, 'मविआ'ची सत्ता केली आणि पवार विरोधी पक्षनेते झाले. तर, विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर पवारांचा हा पहिलाच पिंपरी दौरा आहे. नव्या सरकारने मविआ सरकारचा तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने पालिका निवडणूक घेण्याचाही निर्णय स्थगितच केला नाही, तर चार सदस्य पद्धतीने ती घेण्याचा नवा निर्णय काल घेतला.

त्यामुळे पुन्हा निवडणुकीची तयारी प्रशासनाला सुरवातीपासून (प्रभागरचना) करावी लागणार आहे. त्यासाठी किमान अडीच महिने जातील. तरीही २०१७ ला गेलेली १५ वर्षाची सत्ता पिंपरी पालिकेत पुन्हा आणण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आतापासूनच कसोशीने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 'निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा' हे ध्येय घेऊन अजितदादांच्या उपस्थितीत 'कार्यकर्ता संवाद' कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन केल्याची माहिती त्यांनी आज दिली.

याप्रसंगी शहरातील आजी, माजी आमदार, जेष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात दुपारी ०२:०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्याला कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गव्हाणे यांनी केले आहे. महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकत कार्यकर्त्यांशी संवादही यावेळी साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल निर्णय घेतला असला, तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोग महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका कधीही घोषित करण्याची शक्यता गव्हाणे यांनी वर्तवली आहे. त्यामुळे त्यासाठी तयार असून पालिकेतील भाजपची सत्ता उलथवून लावण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माजी नगरसेवकांनी केला आहे, असे ते म्हणाले.

गेल्या पाच वर्षातील भाजपच्या पालिकेतील भ्रष्टाचाराला पिंपरी-चिंचवडकर वैतागले असल्याने त्यांची सत्ता उलटवून लावण्यासाठी तयारी सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राष्ट्रवादी हाच पर्याय असल्याने जनतेचीही आम्हाला साथ मिळत आहे, असा दावा त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT