Mahavikas Aghadi Sarkarnama
पुणे

Mahavikas Aghadi : 'मविआ'चं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं ? रोहित पवारांनी थेटच सांगितलं...

Sudesh Mitkar

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जागा वाटपाचा खल महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये सुरू आहे. आतापर्यंत 40 जागांवरती तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असून आठ जागासंदर्भात पेच कायम असल्याचं बोललं जात आहे. यावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

पुण्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार गटाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकींना सामोरे जाण्याची रणनीती या बैठकीतून आखण्यात आली. या बैठकीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांची संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोहित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे विलीनीकरनांच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नियोजनाबाबत शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी असून या सुनावणीमध्ये आम्हाला देण्यात आलेले पक्ष आणि आम्ही निवडणारे चिन्ह हे किती दिवसांसाठी असेल, याबाबत स्पष्टता येईल. या सुनावणीनंतर चिन्हाबाबत काय निर्णय घ्यायचा हे ठरवणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.

राज्यसभेला कोणता उमेदवार द्यायचा याबाबत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, त्यानुसार एक उमेदवार द्यायचा की दोन उमेदवार, याचा निर्णय होणार असून जो उमेदवार निश्चित होईल. त्याच्या पाठीमागे पूर्ण ताकतीने उभे राहण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आगामी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाच व्हीप लागू होणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या 48 जागांबाबत चर्चा सुरू असून 40 जागांचा तिढा सुटला असून फक्त आठ जागांवरती चर्चा सुरू आहे. दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे देखील माहिती नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असून आठ जागेचा तिढा देखील लवकरात लवकर सुटेल, असं रोहित पवार म्हणाले.

मराठा आंदोलनाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, मनोज जरांगे यांनी काळजी घ्यावी. आरक्षणाच्या बाबतीत भाजप कधीही ठोस निर्णय घेत नाही. ते दिशाभूलच करतं. मागच्या गोष्टी पाहिल्या तर मराठा आरक्षणाच्या विरोधात सदावर्ते यांच्यासारखे भाजप नेते कोर्टात गेले होते.

तसेच ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकू नये, म्हणून भाजपचा जळगावचा कार्यकर्ता कोर्टामध्ये गेला होता. त्यामुळे भाजप जाणून बसून मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण करत असून भाजपला कोणतेही नवीन आरक्षण द्यायचे नाही. या उलट जुने आरक्षण काढून घ्यायचे आहे. त्यामुळे 2024 ला जर केंद्रात भाजपचे सरकार आले तर संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेण्याचं काम भाजप करेल, असं रोहित पवार म्हणले.

दिल्लीमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनावर भाजप अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आहे. शेतकऱ्यांबरोबर अशा प्रकारे वागणं चुकीचं असून यापूर्वी जेव्हा शेतकरी आंदोलन झाले होते तेव्हा अजित पवार यांनी सरकार विरोधात भूमिका घेतली होती. आता मात्र अजित पवार या आंदोलनाविषयी काहीच बोलत नसल्याची टीका रोहित पवार यांनी केली.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT