MLA Sunil Shelke News, Maharashtra vidhan sabha news
MLA Sunil Shelke News, Maharashtra vidhan sabha news  Sarkarnama
पुणे

... तर 2011 ची पुनरावृत्ती होईल! संतापलेल्या आमदार शेळकेंनी विधानसभेतच दिला इशारा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मावळचे आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) शुक्रवारी विधानसभेत चांगलेच संतापले. पवना धरणग्रस्त व पाण्याच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा करण्यासाठी ते आग्रही होते. पण मागील पाच दिवसांपासून पाठपुरावा करून लक्षवेधी घेतली जात नसल्याने त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्यावर थेट आरोप केले. आपण जाणीवपूर्वक ही लक्षवेधी घेत नसल्याचे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी 2011 ची पुनरावृत्ती होईल, असा इशाराही दिला. (Assembly Session)

मावळमध्ये (Maval) 2011 मध्ये शेतकरी आंदोलनावेळी गोळीबाराची घटना घडली होती. शेळके यांनी याचीच आठवण सभागृहाला करून दिली. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनअंतर्गत बोलताना शेळके म्हणाले, मागील पाच दिवसांपासून माझ्या मतदारसंघातील पवना धरणग्रस्तांचा विषय मांडण्यासाठी लक्षवेधी मांडण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. काल तुम्ही लक्षवेधी घेतली. काल सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत सभागृहात उपस्थित राहिलो. अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली नाही, म्हणून मंत्र्यांनी लक्षवेधी पुढे ढकलली. (MLA Sunil Shelke News)

आजसुध्दा लक्षवेधी लावली नाही. जाणीवपूर्वक काही अधिकारी चुकीचे काम करत आहेत. गेले 40 ते 45 वर्षांपासूनचा प्रश्न आहे. त्यामुळं मी सातत्याने सांगतोय लक्षवेधी घ्या. संपूर्ण प्रकरण मी अधिकाऱ्यांकडे दिलं आहे, असं शेळके यांनी सांगितले. त्यावर अध्यक्षांनी त्याची स्वतंत्र मिटींग घेऊ, असं सांगत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा माईक बंद करण्यात आला. पण त्यानंतरही शेळके शांत राहिले नाहीत.

माईक पुन्हा सुरू झाल्यानंतर शेळके चांगलेच संतापले होते. अध्यक्षमहोदय, आज सभागृहात कुणी नाही. किमान आजतरी माझा प्रश्न घ्या. तुम्ही लक्षवेधी लावत नाही, याचा अर्थ संपलं असं नाही. 2011 ची पुनरावृत्ती होईल. तुम्ही आज माझ्या धरणग्रस्तांचा, पाण्याचा प्रश्न जाणीवपूर्वक लावत नाही. मी चार दिवसांपासून सांगतोय, माझा प्रश्न घ्या, असं संतापलेल्या स्वरात बोलत शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर मिटींग लावू, एवढंच सांगत अध्यक्षांनी पुन्हा शेळेक यांना शांत केलं.

काय घडलं होतं 2011 मध्ये?

पुणे जिल्ह्यातील मावळ येथे 9 ऑगस्ट 2011 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) पवना धरणापासूनच्या पाइपलाइन विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन झाले होते. त्यावेळी जमाव हिंसक झाल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला होता. तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप कर्णिक आणि त्यांच्या सहका-यांनी केलेल्या गोळीबाराची चौकशी करण्यासाठी न्या. एम. जी. गायकवाड यांची चौकशी समिती नेमली होती. कर्णिक व त्यांच्या सहका-यांवर कारवाईची शिफारस समितीने केली होती. गोळीबारात एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर 14 आंदोलक जखमी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT