Sunil Shelke
Sunil Shelke sarkarnama
पुणे

भोंग्या' मागचा खरा 'ढोंग्या' नागपूरचा : सुनिल शेळके

उत्तम कुटे

पिंपरी : चार मे नंतर मशिदीवर भोंगे वाजले, तर त्याच्यासमोर दुप्पट आवाजात भोंग्यावर हनुमान चालिसा लावण्याचा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारच्या (ता.१) औरंगाबाद येथील सभेत केला. त्यावर पुन्हा तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. मावळचे (जि. पुणे) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Ncp) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनीही राज यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार सोमवारी (ता.२) घेतला. मशिदींवरील भोंग्यांचा विषय तापवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा विरोधकांचा कावा असून या 'भोंग्या' मागचा खरा 'ढोंग्या' नागपूरचा आहे, अशा शब्दांत त्यांनी राज यांच्याबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही हल्लाबोल केला.

मुंबई महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी सुरु असलेला हा सर्व खटाटोप आहे, असा आरोप शेळके यांनी केला आहे. मशिदींवरील भोंग्यांचा विषय राज तापवत असले तरी त्यामागील खरे सूत्रधार फडणवीस आहेत. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत का निर्णय घेतला नाही, असा सवाल शेळके यांनी उपस्थित केला. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याच्या हेतूने असे उपद्व्याप करण्याचा विरोधकांचा डाव सुरु आहे.

भोंग्यामागच्या नागपूरच्या ढोंगी नेत्यांनी त्यांच्याच शहरातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा आदर्श घ्यावा, असा टोला त्यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे लोकहिताचे निर्णय घेत असल्यामुळे विरोधकांकडे टीका करण्यासाठी कोणताच मुद्दा उरलेला नाही. त्यामुळे महागाई, रोजगार, विकास यावर न बोलता समाजात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी अशा गोष्टींना खतपाणी देण्याचे काम सुरु आहे. परंतु महाराष्ट्राची जनता सुजाण असून राज्यात धार्मिक तेढ वाढविण्याच्या कारस्थानांना जनता कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास देखील शेळके यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT