Dr.Sulakshana Shilwant-Dhar and Anna Bansode Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad: राष्ट्रवादीचे दोन्ही गट भिडणार; पिंपरीत बनसोडे, शिलवंत-धर यांच्यात होणार लढत ?

उत्तम कुटे

Pimpri News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आगामी लोकसभेला शिरूर, बारामती, सातारा, रायगडसारख्या अनेक मतदारसंघांत या पक्षाच्या दोन्ही गटांनी दावा केल्याने तेथे त्यांच्यातच लढाई होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर विधानसभेलाही असेच चित्र राहील, अशी चिन्हे आहेत. त्याला राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विधानातून शनिवारी दुजोरा मिळाला.

पिंपरी-चिंचवडमधील आपल्या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या पाटील यांनी नंतर घेतलेल्या सभेत पिंपरीतील विधानसभेच्या उमेदवाराचे नाव जवळपास नक्की केले. गतवेळी 2019 ला राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर करून नंतर ऐनवेळी अचानक ती रद्द केलेल्या माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांच्या नावाची घोषणाच त्यांनी करून टाकली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याबरोबरच इतर कोणी इच्छुक असतील, तर त्यांनीही भेटावे, आपले पुस्तक खुलं आहे, असेही ते म्हणाले. पाटलांच्या या घोषणेने पिंपरीत राष्ट्रवादीचेच दोन्ही गट विधानसभेला झुंजणार असल्याचे आताच स्पष्ट झाले आहे. कारण तेथील विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अण्णा बनसोडे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक असून, त्यांनाच तेथून महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

पक्षाचे गतवेळी पिंपरी महापालिकेत 37 नगरसेवक निवडून आले होते. त्यातील शिलवंत या एकमेव मूळ पक्षासोबत राहिल्या आहेत. त्यांचे तिकीट गेल्यावेळी ऐनवेळी कापून अण्णा बनसोडे यांना ते राष्ट्रवादीने दिले होते. ते निवडून आले. 2024 ला तेच पुन्हा महायुतीकडून पिंपरीत उमेदवार असण्याची शक्यता आहे. कारण अजित पवारांच्या 2019 च्या पहिल्या व 2023 च्या दुसऱ्या बंडातही ते शेवटपर्यंत सोबत राहिलेले आहेत.

ही जागा युतीत शिवसेनेकडे आहे. 2014 ला त्यांचे तेथे आमदार (अॅड. गौतम चाबुकस्वार) निवडून आले होते. त्यामुळे या वेळी त्यांची आडकाठी राहू नये, म्हणून शिवसेनेकडे (शिंदे गट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे त्यांची दोनदा भेट घेत बनसोडेंनी अगोदरच साखरपेरणी करून ठेवली आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT