Pune News : पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या पारंपरिक बळावर निवडणूक लढविता येत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपच्या वाढत्या ताकदीमुळे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपस्थितीमुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाला इतर पक्ष व गटांमधून उमेदवारांची ‘आयात’, फोडाफोडी आणि थेट तडजोडी कराव्या लागल्या आहेत.
भोर, जेजुरी, राजगुरुनगर (खेड), इंदापूर, तळेगाव ढमढेरे, फुरसुंगी आदी महत्त्वाच्या नगरपरिषदा-नगरपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्वबळावर तुल्यबळ उमेदवार उभे करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि स्थानिक स्वतंत्र गटांमधून कार्यकर्ते-नेते फोडून किंवा त्यांच्याशी सत्तेच्या वाटणीची तडजोड करूनच अजित पवारांचा पक्ष रिंगणात उतरला आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायत: येथे कट्टर विरोधक रंजन तावरे यांच्याबरोबर आघाडी करावी लागली.जेजुरी नगरपरिषद: सर्वपक्षीय वर्चस्व असलेले दिलीप बारभाई यांचा मुलगा आणि माजी नगरसेवकांना अजित गटात घेऊन उभे केले आहे.
भोर नगरपरिषद: पूर्वाश्रमीच्या थोपटे गटातील असलेल्या रामचंद्र आचारे यांना फोडून पक्षात आणले आहे. खेड-राजगुरुनगर: स्वतःचा तुल्यबळ उमेदवार नसल्याने सर्वपक्षीय प्रताप आहेर यांना गळाला लावून नगराध्यक्षपदासाठी उभे केले आहे. तळेगाव ढमढेरे ,येथे भाजपचे प्रबळ वर्चस्व असल्याने अडीच वर्षे नगराध्यक्षपद देण्याची तडजोड करावी लागली आहे. फुरसुंगी नगरपंचायतमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर तडजोड केली आहे.
या सर्व घडामोडींमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील (NCP) निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. अनेक जुन्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने अंतर्गत असंतोष वाढला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः ‘त्यांच्या खास स्टाइल’ने नाराजांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्यांचे राजकीय वर्चस्व आता पूर्वीसारखे एकहाती राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे
या निवडणुकांमधून भाजपनं पुणे जिल्ह्यात आपले पाय घट्ट रोवले असून, अजित पवार यांच्या पक्षाला आता फक्त फोडाफोडी आणि तडजोडींच्या जोरावरच मैदान मारव लागत असल्याचे चित्र आहे. शरद पवार गटालाही या प्रक्रियेत सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे. या निवडणुका पुणे जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचे स्पष्ट दर्शन घडवित आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.