बारामती : सत्ता आल्यानंतर बारामतीत प्रस्थापित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची मरगळ आली आहे. वेळ नसलेल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून संधी दिली गेल्याने आंदोलनाच्या वेळेस पदाधिकारी गायब असतात हे चित्र नबाब मलिक (Navab Malik) यांच्या अटकेचा निषेध करण्याच्या आंदोलनाच्या निमित्तानेही बारामतीत (In Baramati) अधोरेखीत झाले.
आज बारामतीत झालेल्या आंदोलनात मोजक्या पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता बहुसंख्य पदाधिकारी गायब असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नियोजित आंदोलन असताना व सर्वांना निरोप गेलेले असतानाही पदाधिकारी आंदोलनाकडे न फिरकल्याने संघटनेतील प्रमुखांनीही या बाबत नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचा बारामती हा बालेकिल्ला.....अजित पवार उपमुख्यमंत्री, सुप्रिया सुळे खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही बारामती ही कर्मभूमी.....राज्यात सर्वाधिक मताधिक्याने अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. सत्तांतरानंतर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर अजित पवार सकाळी पाच वाजल्यापासूनच कामाला सुरवात करतात. त्यांच्या कार्यशैलीची चर्चा राज्यात असते.
दुसरीकडे बारामतीत नगरपालिकेपासून ते पंचायत समिती, दूध संघापासून ते बाजार समिती व बारामती बँकेपासून ते साखर कारखान्यांपर्यंत सगळीकडे राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. ज्या संस्थांवर राष्ट्रवादीने विविध कार्यकर्त्यांना संचालक किंवा सभासद सदस्य म्हणून संधी दिली आहे त्यांची यादी काढली तर किमान पाचशे पदाधिकारी सहज निघतील. राष्ट्रवादीची रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची वेळ येते तेव्हा कार्यकर्ते आघाडीवर आणि पदाधिकारी गायब, अशी स्थिती असते.
ज्या पक्षाने संधी दिली त्या पक्षाच्या कार्यक्रमांसह आंदोलनांदेखील पदाधिकारी फिरकतच नाहीत, अशी कार्यकर्त्यांची तक्रार असते. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात ताकद दिसायला हवी प्रत्यक्षात स्थिती वेगळीच असते. आंदोलन करायचे म्हटले की संघटनेच्या पदाधिका-यांनाच कार्यकर्ते व पदाधिकारी किती गोळा होतील याची धास्ती असते.
विविध संस्थांच्या पदाधिका-यांचा इतर वेळेस मोठा रुबाब असतो पण आंदोलन करायचे म्हटले की त्यांच्याकडे वेळच नसतो, अशा वेळेस सतरंज्या उचलणा-या कार्यकर्त्यांच्या जिवावरच आंदोलन होते, अशी खंत सामान्य कार्यकर्ते बोलून दाखवितात. अनेक वर्षे सत्ता असल्याने आंदोलनाची राष्ट्रवादीची सवयच मोडली की काय अशी स्थिती बारामतीत अनेकदा दिसते.
कार्यक्रम किंवा आंदोलन गेले किंवा नाही गेले तरी कोणी विचारतच नाही त्या मुळे पदाधिकारीही बेफिकीर असतात. अनेक पदाधिका-यांचा रुबाब पाहून लोक त्यांच्याकडे काम घेऊन जायलाही धजावतात अशी काही कार्यकर्त्यांबाबत स्थिती आहे. जे पदाधिकारी आहेत, त्या पैकी अपवाद वगळता इतरांची सांपत्तिक स्थिती उत्तम असल्याने व त्यांना त्यांचाच मोठा व्याप असल्याने त्यांच्याकडे संघटनेच्या काम व आंदोलनांसाठी वेळच नसतो ही वस्तुस्थिती नेत्यांनीही या पुढील काळात पदे देताना विचारात घ्यायला हवी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षासाठी ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांना पदे देऊच नका व ही बाब कटाक्षाने पाळा, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
महाविकास आघाडी असताना आम्हाला बारामतीत विचारात घेतले जात नाही अशी भावना कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. सेना व कॉंग्रेसला सोबत घेऊन जाण्यातही राष्ट्रवादी अपयशी ठरल्याची मित्रपक्षांची भूमिका आहे.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.