पिंपरी : राष्ट्रवादीतून फुटून अजित पवार गट राज्यातील भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर त्यांना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पडलेल्या फूटीचे धक्के आजही पक्षातील पदाधिकाऱ्यांना बसत आहेत.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना या कारवाईला अधिक संख्येने सामोरे जावे लागत आहे. त्यात पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची पहिली विकेट पडली. १२ जुलैला राज्यातील सात महिला पदाधिकाऱ्यांवर ही संक्रात आली. प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी त्यांची हकालपट्टी केली. पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा कविता आल्हाट, निरीक्षक वैशाली नागवडेंचा त्यात समावेश होता.
त्यानंतर आता राष्ट्रवादी (शरद पवार गट) अजून आक्रमक झाली आहे. आज राष्ट्रवादीने (शरद पवार गट) तब्बल २१ जिल्हाध्यक्षांची (पुरुष पदाधिकारी) सामूहिक हकालपट्टी केली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील पाच पदाधिकारी आहेत.
शहर जिल्हाध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, राहुल भोसले आणि फजल शेख यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या सहीच्या पत्राव्दारे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. त्यांना पदावरूनच नाही, तर पक्षाच्या सदस्यत्वावरूनही बडतर्फ करण्यात आले आहे.
दोन जुलै रोजी रोजी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नऊ आमदारांनाही अपात्र करण्याची कारवाई सुरु करण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या या आमदारांना (अजित पवार गट) पाठिंबा देणे ही पक्षविरोधी कृती असल्याने या पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे या पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे.
ए.वाय.पाटील (कोल्हापूर ग्रामीण) रविंद् पगार (नाशिक, दिंडोरी लोकसभा), अभिजित खोसे (नगर शहर कार्य़ाध्यक्ष), प्रा.माणिकराव विधाते (नगर शहर अध्यक्ष), बाबाजी जाधव (रत्नागिरी), राजाराम मुळीक (वसई-विरार), अभिजित मोरे (नंदूरबार), प्रताप देशमुख (परभणी), कैलास पाटील (औरंगाबाद ग्रामीण), राजेश्वर चव्हाण (बीड), आबासाहेब पाटील (लातूर ग्रामीण अध्यक्ष), अफसर शेख (लातूर ग्रामीण कार्याध्यक्ष), प्रशांत पाटील (लातूर शहर), सुरेश बिराजदार (उस्मानाबाद), चंद्रकांत ठाकरे (वाशीम)आणि बाळासाहेब पाटील-कामारकर (यवतमाळ) हे राष्ट्रवादीने बडतर्फे केलेले इतर जिल्हाध्यक्ष आहेत.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.