Sharad Pawar,bhagat singh koshyari sarkarnama
पुणे

कोश्यारींसारखा 'कर्तृत्ववान' राज्यपाल पाहिला नाही ; शरद पवारांचा टोमणा

घटनात्मक पदावरील नेमणुकांच्या निमित्ताने त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना अशा नेमणुकांमध्ये दखल घेण्याचे आवाहन पवारांनी केले आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त विधान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्धवट भाषण सोडून जाणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) सध्या टीकेचा विषय बनले आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला. पवार पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या प्रश्नाला पवारांनी उत्तर दिले. ''कोश्यारी महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक प्रकार घडत आहेत. राज्यकर्ता म्हणून मी जेव्हा काम करीत होतो. तेव्हा अनेक चांगले आणि कर्तृत्ववान राज्यपाल यांचे राज्यासाठी काम पाहता आले. त्यामध्ये पीसी अलेक्झांडर यांच्यासारखे कर्तृत्ववान राज्यपालही आम्ही पाहिले. पण हल्लीच्या राज्यपालावर भाष्य न केलेले बरे,'' असा टोमणा पवारांनी लगावला.

पवार म्हणाले, ''राज्यपाल यासारख्या घटनात्मक पदावर कोणत्या व्यक्तीला नेमावे हा केंद्र सरकारचा अधिकार आहे. आता १२ आमदारांच्या नेमणुकांबाबत एक वर्ष होऊन गेले, तरीही आमदारांच्या नेमणुका केल्या जात नाही. जर राज्यपालांसारखी व्यक्ती निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून पदाची ती प्रतिष्ठा ठेवणार नसतील, तर राष्ट्रपती, पंतप्रधानांनी यासारख्या पदाचा विचार करावा,''

''मला अनेक राज्यपालांचे काम पाहता आले. पण कोश्यारी यांच्यासारखा 'कर्तृत्ववान' राज्यपाल पाहिला नाही,'' असा टोमणा पवारांनी हाणला. राज्यपालांच्या वागणुकीबाबत बोलताना त्यांनी अशा घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेवरच बोट ठेवले आहे. घटनात्मक पदावरील नेमणुकांच्या निमित्ताने त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना अशा नेमणुकांमध्ये दखल घेण्याचे आवाहन पवारांनी केले आहे.

शरद पवार म्हणाले, ''रशिया, युक्रेनमधील अनेक विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना तेथून कसे बाहेर काढता येईल, याकडे केंद्र सरकारने अधिक लक्ष दिले पाहिजे. याबाबत माझे परराष्ट्र मंत्र्यांशी बोलणं झालं आहे. यात कुणीही राजकारण आणू नये. सगळ्यांनी एकत्र येऊन युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय मुलांना कसे आणता येईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,''

पु्ण्यात नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे, याबाबत पवार म्हणाले, ''मी या संदर्भात एक बैठक घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यामध्ये पर्यावरण तज्ज्ञ, जलसंपदा विभागाचे अधिकारी असतील. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. त्या मी वाचल्या आहेत. त्या सूचनाचे पालन व्हायला हवं अन्यथा भविष्यात त्याची झळ ही पुणेकरांना बसू शकते,''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT