Pune News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सर्वाधिक इनकमिंग हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांमध्ये होताना दिसत आहे. 2019 च्या निवडणुका दरम्यान अशाच प्रकारची मेगा इन्कमिंग भाजपमध्ये झाली होती. त्यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावरून विरोधकांनी भाजपाकडे भ्रष्टाचारी नेत्यांना स्वच्छ करण्याची वॉशिंग मशीन आहे, अशी टीका केली होती. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये इन्कमिंग होत असताना पक्षाचे धोरण काय असणार याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी खुलासा केला आहे.
पुणे दौरा दरम्यान जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. वाईचे माजी आमदार आणि भाजप नेते मदन भोसले यांनी आज जयंत पाटील यांनी भेट घेतली. यानंतर मदन भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.
याबाबत जयंत पाटील म्हणाले, मी मदन भोसले यांना सहजच भेटायला गेलो होतो या भेटीदरम्यान पक्षप्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. माझे आणि त्यांचे अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांच्याकडे चहासाठी गेलो असल्याचा खुलासा करत मदन भोसले यांच्या पक्षप्रवेशावर जास्त बोलणं जयंत पाटील यांनी टाळलं.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक इनकमिंग हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे असल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र मध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे. आमच्याकडे आल्यानंतर त्यांना भयमुक्त वातावरणात काम करता येईल असं वाटत असल्याने आमच्याकडे लोकांचा ओढा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांमध्ये येऊ इच्छित असणाऱ्यांना आम्ही आहे, तसे घेणार आहोत कारण आमच्याकडे स्वच्छ करणारी लॉन्ड्री नाही. आतापर्यंत आम्ही कोणावरही आरोप केलेले नाही. त्यामुळे त्यांना स्वच्छ करून घेण्याची आम्हाला आवश्यकता पडणार नाही. ज्यांनी आरोप केले त्यांनी त्यांना स्वच्छ केला असेल त्यामुळे ते स्वच्छ झालेत असं समजून त्यांना आम्ही आमच्याकडे घेऊ असं जयंत पाटील म्हणाले.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच तुतारी वाजवतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. सुप्रिया सुळे यांनी देखील हर्षवर्धन पाटील हे हिताचा निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभूमी वर जयंत पाटील यांना याबाबत विचारलं असता पाटील यांनी आम्ही अद्याप इंदापूर पर्यंत पोहोचलो नसल्याचे सांगत या प्रश्नाला बगल दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण वाढल्याची टीका केली होती यावर जयंत पाटील म्हणाले,राज ठाकरे यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही आतापर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना शरद पवार सोबत घेऊन चालले आहेत आणि हे सबंध महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. जे पक्ष जातीपातीचे राजकारण करत आहे त्यांच्याविषयी राज ठाकरेंनी बोलावं मात्र शरद पवार यांनी सर्वच समाजातील लोकांना पुढे आणण्याचं काम केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या बोलण्यामध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.