Ramesh Thorat Sarkarnama
पुणे

उमेदवारीसाठी राष्ट्रवादीने मतदान घेतले; पण माजी संचालकाच्या वडिलाने थोरातांना धारेवर धरलेच!

वैशाली नागवडे यांनी पक्ष देईल तो उमेदवार मान्य असेल असे सांगत मतदानास नकार दिला.

रमेश वत्रे

केडगाव (जि. पुणे) : पुणे जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (कात्रज डेअरी, Katraj dairy) संचालक मंडळाच्या निवडणुकीत दौंड तालुक्यातून कोणत्या इच्छुकाला राष्ट्रवादी काँग्रेसची (ncp) उमेदवारी द्यायची, यासाठी पक्षाच्या वतीने सोमवारी (ता. १४ फेब्रुवारी) खुटबाव येथे मतदान घेण्यात आले. या मतदानाचा निकाल दोन दिवसानंतर जाहीर करण्यात येणार आहे. जास्त मतदान घेणाऱ्या इच्छुकास उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी दिली. (NCP took voting in Daund for Katraj Dudh Sangh's election candidature)

पुणे जिल्हा दूध संघाची निवडणूक २१ मार्च रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी तालुका मतदार संघातून राहुल दिवेकर, सागर फडके, पोपटराव ताकवणे इच्छुक आहेत. फडके आणि दिवेकर तीव्र इच्छुक आहेत. राष्ट्रवादीच्या सर्व मतदारांना खुटबाव येथे बोलविण्यात आले होते. यावेळी ६० ते ७० मतदार उपस्थित होते. उमेदवारांच्या नावाने चिठ्ठीने गुप्त मतदान घेण्यात आले. यावेळी राहुल दिवेकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

यावेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, महानंदच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, संघाचे माजी संचालक नानासाहेब फडके उपस्थित होते. मतदान गुप्त असले तरी उमेदवारी देण्यासाठी ही पद्धत योग्य नसल्याचे इच्छुक उमेदवार व प्रतिनिधींचे मत आहे. या मतदान प्रक्रियेवरून दूध संघाचे माजी संचालक तथा इच्छुक उमेदवार सागर फडके यांचे वडील नानासाहेब फडके व माजी आमदार रमेश थोरात यांच्यात खडाजंगी झाली. वैशाली नागवडे यांनी पक्ष देईल तो उमेदवार मान्य असेल असे सांगत मतदानास नकार दिला. भीमा-पाटस कारखान्याचे पाटस येथील माजी संचालक योगेंद्र शितोळे यांनी हीच भूमिका घेत मतदानास प्रारंभी नकार दिला. उमेदवारांच्या इच्छेखातर नंतर त्यांनी मतदान केले.

दरम्यान दूध संघाच्या गेल्या निवडणुकीतही अशीच चाचपणी करण्यात आली होती. उमेदवारीवर एकमत न झाल्याने त्यावेळी नानासाहेब फडके व रामदास दिवेकर यांच्यात मैत्री पूर्ण लढत झाली होती. त्या निवडणुकीत दिवेकर यांचा विजय झाला होता. पुणे जिल्ह्यात अशी गुप्त मतदानाची पद्धत फक्त दौंड तालुक्यात आहे. ही पद्धत सर्वच निवडणुकांना लावणार का, असाही मुद्दा काही कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

आप्पासाहेब पवार म्हणाले की, दूध संघाच्या निवडणुकीतील उमेदवारासंदर्भात घेण्यात आलेल्या मतदानाचा निकाल दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल. ज्याला जास्त मते मिळतील, त्याला पक्ष उमेदवारी देईल. आरक्षित जागांसंदर्भात पुढील दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT