Baramati News: अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रेकॉर्डब्रेक मतांनी विजय मिळवल्यानंतर आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी येत्या 18 जूनला पोटनिवडणूक होत आहे. या उमेदवारीसाठी मंत्री छगन भुजबळांचं नाव पुढे आले आहेत. त्यांचं नाव फायनल झाल्याची चर्चा असतानाच स्वत: सुनेत्रा पवारांनीच केलेल्या नव्या दाव्यामुळे या उमेदवारीबाबत नवा ट्विस्ट आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत येत्या 8 जूनला दुपारी चार वाजता संपणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळांसह इच्छुक नेत्यांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यासाठी धडपड सुरू आहे. याचदरम्यान, सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या उमेदवारीवरही भाष्य केलं.
बारामतीत मतदारसंघात शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुनेत्रा पवारांनी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्यांनी राज्यसभेच्या उमेदवारीवरही प्रतिक्रिया दिली.
मात्र, एकीकडे राज्यसभेच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू असतानाच सुनेत्रा पवारांनी बारामतीत छगन भुजबळांच्या उमेदवारीविषयी आत्ताच काही सांगता येणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी तुम्हाला आज संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत राज्यसभेच्या उमेदवाराचं नाव कळेल असं सांगितलं आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांनीच उमेदवारीवरुन टाकलेल्या नव्या बॉम्बेमुळे राज्यसभेविषयीचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. त्या म्हणाल्या,छगन भुजबळ यांचं नाव राज्यसभेच्या उमेदवारीकरिता आहे की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. जे या निवडणुकीला इच्छुक असतात, त्या सर्वच उमेदवारांचा सारासार विचार करावा लागतो,असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
तसेच सुनेत्रा पवारांनी प्रत्येक पक्षामध्ये सगळ्यांचा विचार घेऊन एक नाव ठरवण्याची पद्धत असल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणुकीसाठी उमेदवारांची चर्चा होत असताना अशी अनेक नावे बाहेर पडत असतात. त्यावर चर्चा होत असते, असंही पवारांनी बारामतीत बोलताना म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवाराचे नाव तुम्हाला आज संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत कळेल अशी भूमिकाही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केली. इकडे राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवस शिल्लक राहिल्यानं शनिवारी सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या दोन बैठका पार पडल्या.
या बैठकानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उमेदवाराच्या नावाबाबत चर्चा केली. त्यावेळी फडणवीस यांनी भाजप पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून निर्णय कळवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, पार्थ पवार उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेसाठी इच्छुक असलेल्या प्रमोद हिंदुराव, मंत्री छगन भुजबळ, अविनाश आदिक, समीर भुजबळ यांच्या नावावर चर्चा झाली. यांपैकी छगन भुजबळ यांची उमेदवारी फायनल मानली जात आहे. मात्र, त्यांनी त्यांच्याकडील मंत्रीपद पुतण्या समीर यांना देण्याची मागणी केल्याने राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने शनिवारी दुपारी फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा समोर आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.