

New Delhi News: केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारच्या तिसऱ्या टर्मची दोन वर्षे येत्या 9 जूनला पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोदींच्या मंत्रिमंडळातील फेरबदलाचं जोरदार वारं पुन्हा एकदा वाहू लागलं आहे. लवकरच अनेक बड्या नेत्यांची खुर्ची जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगाल,आसामसारखी मोठं राज्य जिंकल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपनं आता आगामी काळात होत असलेल्या सात राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप लवकरच मंत्रिमंडळ फेरबदलाचा मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. या सातपैकी फक्त दोनच राज्यांत भाजप सत्तेपासून दूर आहे, बाकी पाचही राज्यांत कमळाची सत्ता आहे. याचदरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात होत असलेल्या फेरबदलात निवडणुका होत असलेल्या सात राज्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात स्थान देऊन सात राज्यांतील मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप प्रयत्नशील असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजपर्यंतचा मंत्रिमंडळ फेरबदलाचा पॅटर्न पाहता 2014 रोजी सत्ता स्थापन केल्यानंतर मोदींच्या नेतृत्वातील सरकारनं तीन टप्प्यांत अर्थात नोव्हेंबर 2014, जुलै 2016 तसेच सप्टेंबर 2017 मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला होता. त्यात पहिला मंत्रिमंडळ विस्तार हा अवघ्या सहाच महिन्यांत करण्यात आला होता.
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये सत्तास्थापन केल्यानंतर 2 वर्षांनी पहिला मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय घेण्यात आला होता. हा बदल जुलै 2021 मध्ये करण्यात आला होता. तर यानंतर मे 2023 मध्ये फक्त खात्यांची अदलाबदल करण्यात आली होती. हा सगळा इतिहास पाहता मोदी सरकार आपल्या तिसऱ्या टर्मची 2 वर्षे पूर्ण होत असताना मंत्रिमंडळ फेरबदल किंवा विस्ताराबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच घेऊ शकते.
आजमितीला पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात 72 मंत्री आहेत.ही संख्या 81 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच मंत्रिमंडळात नव्या 9 मंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमधील मतदार आणि इतर राजकीय आराखडे डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ फेरबदल केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पंतप्रधान कार्यालयाने सर्व विभागांच्या कामाचा तपशील मागवला. यानंतर, मंत्रिमंडळाने एका बैठकीत सर्व विभागांच्या कामाचा आढावा घेतला. या आढाव्यादरम्यान विभागांना मानांकनही देण्यात आले. अपेक्षेनुसार कामगिरी न केलेल्या विभागांची कामगिरी हा देखील मंत्रिमंडळ विस्तारातील एक महत्त्वाचा घटक असणार असल्याचं बोललं जात आहे.
तसेच गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या संघटनात्मक आणि सरकारी अशा दोन्ही स्तरांवरील अलीकडील घडामोडी वाढल्या आहेत. याच धर्तीवर केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल व विस्ताराबाबत शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांचा कार्यकाळ येत्या 21 जून रोजी संपत असूनही, पक्षाने त्यांना राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी नाकारली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.