Pimpri Chinchwad News : अजित पवार यांची गटाचं राष्ट्रवादी काँग्रस ही राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सत्तेत २ जुलैला सामील झाली. तोपर्यंत राज्य मंत्रिमंडळ विस्तारात पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे भाजप आमदार महेशदादा लांडगे (Mahesh Landge) यांचेच फक्त नाव घेतले जात होते. पण आता शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंच्याही (Anna Bansode) नावाची सुद्धा चर्चा सुरु झाली आहे. त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला, तर राज्य मंत्रीमंडळात दोन बनसोडे होतील. (Latest Marathi News)
दरम्यान, कुठल्याही क्षणी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारात दादा की अण्णांना लॉटरी लागते, याकडे आता उद्योगनगरीचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे शहराचा मंत्रीपदाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी एकवटली आहे. त्यांनी आमदार बनसोडेंना मंत्रीपद देण्याची लेखी मागणी आपले नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन काल केली.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शहरातील ज्येष्ठ नेते भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक शाम लांडे, राहुल भोसले, पंकज भालेकर, मयूर कलाटे, निलेश डोके, विजय लोखंडे, धनंजय भालेकर, संजय औसरमल, विनय शिंदे, सागर कसबे आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता. त्यातून दादानंतर आता अण्णांना मंत्रीपद मिळण्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. किमान राज्यमंत्रीपदाच्या दर्जाचे महामंडळाचे अध्यक्षपद तरी मिळावे, अशी भावना राष्ट्रवादीच्या काल भेटलेल्या काही नेत्यांनी `सरकारनामा`कडे आज बोलून दाखवली. तशीच ती भाजपच नाही, तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही आहे.
पुणे जिल्ह्यातून फक्त चंद्रकांत पाटील हे सध्या राज्य मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आणखी एक - दोन आमदारांची तेथे वर्णी लागू शकते. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आमदार महेश लांडगेंचे नाव घेतले जात आहे. पण, दोन जुलैला राष्ट्रवादी सत्तेत सामील झाल्याने आता दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांचे कट्टर समर्थक बनसोडेंचे नावही चर्चेत आले आहे. कारण ते अजित पवार यापूर्वीच्या २०१९ च्या पहिल्या बंडातही त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहिले होते. आताही बरोबर आहेत. त्याची बक्षीसी म्हणून त्यांना राज्यमंत्री केले जाईल,असा होरा आहे.त्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीनेही नेट लावला आहे.त्यांना मंत्रीपद देण्यात यावे यासाठी नुकतीच (ता.४) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कार्यकारिणीची बैठक झाली.त्यात तसा ठरावही करण्यात आला.
एवढेच नाही, तर त्याची प्रत घेऊन शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी काल मुंबईत अजितदादांची भेटही घेतली.त्यामुळे त्याचा विचार करून शहराला दादा मंत्रीपद देतील वा किमान त्या दर्जाचे महामंडळाचे अध्यक्षपद तरी देतील, असा विश्वास त्यासाठी काल मुंबईवारी केलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळातील काहींनी आज `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.