Shankar Mandekar joins ShivSena
Shankar Mandekar joins ShivSena Sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच दणका : जिल्हा परिषद सदस्याचा शिवसेनेत प्रवेश!

धोंडिबा कुंभार

पिरंगुट (जि. पुणे) : बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातच राष्ट्रवादी काँग्रेसला (ncp) शिवसेनेने (shivsena) जोरदार दणका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांनी शनिवारी (ता. १९ फेब्रुवारी) पक्षाशी काडीमोड घेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. खुद्द पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी येरवडा येथील एका कार्यक्रमात मांडेकर यांच्या हाती शिवबंधन बांधत त्यांच्याकडे भगवा सोपवला. (NCP's Zilla Parishad member Shankar Mandekar joins Shiv Sena)

शंकर मांडेकर हे माण-हिंजवडी गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे मुळशी तालुकाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. मांडेकर यांच्या शिवसेना प्रवेशाने तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले असून आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकींवर त्याचे नक्कीच पडसाद उमटणार आहेत. मांडेकर यांच्या सोबत वातुंडे ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल शिंदे, घोटावडेचे संदीप खानेकर, चांदेचे गणेश मांडेकर, सुखदेव मांडेकर, रामकृष्ण ससार तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

पक्ष प्रवेशाच्या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर तसेच जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे उपस्थित होते.

शिवसेना प्रवेशाबाबत मांडेकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मुळशीतील गटबाजीला वैतागून व कंटाळून आपण शिवसेनेत प्रवेश करीत आहोत. आपण तळागाळापर्यंत प्रामाणिक काम करायचे आणि काही संधीसाधूंनी केवळ आयत्या रेघोट्या ओढायच्या, अशी परिस्थिती राष्ट्रवादीत झाली होती. तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी केवळ स्वतःचा गट उभा करण्याचे काम केले. त्यांनी विविध पदांवर ज्या व्यक्तींना जनमानसांत स्थान नाही अशा चुकीच्या व अकार्यक्षम व्यक्तींना पदे देऊन मोठे केले. त्यामुळे अनेक सक्षम व संघटनात्मक काम करणाऱ्या, पक्षाचे हित पाहणाऱ्यांना डावलले गेल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. ही बाब पक्ष श्रेष्ठींच्या कानावर वारंवार घालूनही त्यात सुधारणा न झाल्याने आपण राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करीत आहोत. थोड्याच दिवसांत तालुक्यातील जनमाणसांत काम करणाऱ्या गावोगावच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे, त्यामुळे मुळशीतील शिवसेना नव्या ताकदीने उभी राहणार आहे.

जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे म्हणाले की, शंकर मांडेकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार याचा आम्हाला विश्वास आहे. माजी सभापती बाळासाहेब पवळे यांनी या प्रवेशाचे एकाच ओळीत वर्णन केले आहे. पवळे म्हणाले, जोर का झटका धिरेसे....वाघ जागा होतोय.

शंकर मांडेकर यांच्या पक्ष सोडण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे म्हणाले की, मांडेकर यांनी यापूर्वी पक्षात राहूनच पक्षविरोधी काम केलेले आहे. पक्षापेक्षा केवळ वैयक्तिक स्वार्थच त्यांनी पाहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही सभेला ते उपस्थित राहिलेले नाही. केवळ स्वार्थासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT