Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Sarkarnama
पुणे

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'च्या जाहिरातीवरून नवा वाद; भाजप आमदाराला द्यावा लागला खुलासा, नेमकं प्रकरण काय?

Sudesh Mitkar

Pune News, 30 July : राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाय ही योजना महायुती सरकारसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत फायदेशीर ठरु शकते असंही बोललं जात आहे.

यासाठीच महायुतीकडून मोठ्या प्रमाणात या योजनेची जाहिरात केली जात आहे. मात्र, आता लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीमध्ये वापरलेल्या फोटोवरून नवा वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांनी छापलेल्या जाहिरातीच्या बॅनरवर दोन महिलांचे फोटो छापण्यात आले आहेत.

ते फोटो छापताना आपली परवानगी घेतली नसल्याच आरोप करत या महिलांनी पोलिसात धाव घेतली आहे. तर या सर्व प्रकरणावर आता आमदार शिरोळे (Siddharth Shirole) यांनी आपण ते फोटो का लावले? याबाबतचा खुलासा केला आहे. याबाबत माध्यमांशी एक व्हिडिओ शेअर करत शिरोळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, राज्य सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावी आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त महिलांना व्हावा, या उद्देशाने पुण्यातील (Pune) शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघात या योजनेबाबत मागील दोन आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पोस्टर लावले आहेत.

या पोस्टरमध्ये वापरण्यात आलेल्या ज्या फोटोबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. तो फोटो हा रीतसर पैसे देऊन जाहिरात संस्थेच्या माध्यमातून विकत घेण्यात आला आहे. हा 2016 चा फोटो असून ज्या फोटोग्राफरने हा फोटो काढला आहे. त्याच्याकडून सर्व प्रकारच्या रीतसर परवानगी घेऊनच या तो फोटो वापरण्यात आला आहे.

'जाहिरातीत हा फोटो वापरण्यामागचा उद्देश एकच आहे की, ही जाहिरात लोकांपर्यंत पोहोचावी. तरीसुद्धा हा फोटो वापरल्याने त्या महिलांना भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असं आमदार शिरोळे म्हणाले. तसेच या महिलांना फूस लावून कोणी पोलिसात जाण्यासाठी दबाव टाकला असेल तर त्याची देखील पोलिसांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

महिलांचा आरोप काय?

दरम्यान सिद्धार्थ शिरोळे यांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत ज्या महिलांचे फोटो वापरण्यात आले होते त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. आपल्याला न विचारता फोटो वापरल्यामुळे कुटुंबात वाद-विवाद आणि गैरसमज निर्माण झाल्याच त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे. हा तक्रार अर्ज सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT