Pimpri chinchwad 

 

Sarkarnama 

पुणे

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून नववर्षाची अशीही भेट..

सशस्त्र गुंडांना निशस्त्र करताना झालेल्या झटापटीत सीपी केपी हे जखमी झाले.

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : पाच दिवसांपूर्वी (ता.२६) उडालेल्या बहूचर्चित चकमकीत पिंपरी-चिंचवडचे पोलिस आय़ुक्त कृष्णप्रकाश तथा केपी हे जखमी झाले होते. त्यानंतरही गळ्यात अडकावलेला प्लॅस्टरचा हात तसाच घेऊन ते थर्टी फर्स्टला पुन्हा फिल्डवर उतरले. त्यांनी मध्यरात्री हिंजवडी येथील एका हुक्का पार्लरवर स्वत रेड केली. तेथे बंदी असलेल्या तंबाखूचा हुक्का हा हर्बल हुक्का म्हणून ग्राहकांना दिला जात होता. त्याचवेळी त्यांच्या संकल्पनेतून शहरात थंडीत कुडकुडणाऱ्या दोनशे बेघरांना गस्तीवरील पोलिसांनी ब्लॅंकेट वाटून नवर्षाची आगळी भेट त्यांना दिली. त्यातून पुल, रस्त्याच्या आडोशाला झोपलेल्यांना पोलिसांच्या या उबेने दिलासा मिळाला.

गेल्या महिन्यात १८ तारखेला पिंपरी-चिंचवड शहरात पिंपळे गुरव येथे योगेश जगताप या सराईत गुंडाचा टोळीयुद्धातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्यातील दोन हल्लेखोर व त्यांचा असे तिघे खेड तालुक्यात कोये येथे येणार असल्याची टीप पोलिसांना २६ तारखेच्या रात्री मिळाली होती. ती मिळताच स्वत केपी हे फिल्डवर उतरले. ते स्वतच या आरोपींना पकडण्यासाठी पथकासह गेले. त्यावेळी रात्री सव्वाअकरा वाजता चकमक उडाली. दोन्ही बाजूंकडून दोन,दोन गोळ्या झाडण्यात आल्या.

यावेळी सशस्त्र गुंडांना निशस्त्र करताना झालेल्या झटापटीत सीपी केपी हे जखमी झाले.त्यामुळे त्यांच्या उजव्या हाताला बॅंडेज,तर डाव्या हाताला प्लॅस्टर घालावे लागले होते.त्याच स्थितीत त्यांनी काल मध्यरात्री हिंजवडीत स्वत धाड टाकली. तेथे परवानगी असलेल्या हर्बल हुक्याच्या नावाखाली बंदी असलेला तंबाखूचा हुक्का दिला जात होता. एचटूओ या हुक्का पार्लरमध्ये हे बेकायदेशीर कृत्य सुरु होते. त्याबाबत तेथील व्यवस्थापक,चालक आदी सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यापूर्वी त्यांनी तेथे तंबाखू हुक्का मिळत असल्याची खात्री बनावट ग्राहक पाठवून करून घेतली होती.

दिवाळी आणि नववर्ष आपल्या हटके अंदाजाने केपी दरवर्षी साजरी करतात. यावर्षीही नववर्षानिमित्त त्यांनी गस्तीवरील आपल्या पोलिसांना दोनशे ब्लॅंकेट दिली.गस्तीदरम्यान रात्री थंडीत कुडकुडणाऱ्या बेघरांना ती देण्यास त्यांनी सांगितले. त्यानुसार थर्टी फर्स्टचा बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांनी पुलाखाली वा रस्त्याच्या आडोश्याला कुडकुडत झोपलेल्यांच्या अंगावर ही ब्लॅंकेट काल मध्यरात्री टाकली.त्यासाठी पोलिसांनी कोणी प्रायोजक शोधला नव्हता. काही पोलिस अधिकाऱ्यांनी स्वखर्चातून ती खरेदी केली होती, असे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी मनीष कल्याणकर यांनी सरकारनामाला सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT