Dr Neelam Gorhe
Dr Neelam Gorhe Sarkarnama
पुणे

'खूप मारल्या गप्पा आणि कुठे गेले...', डॉ. गोऱ्हेंचा बारणेंवर निशाणा

उत्तम कुटे- सरकारनामा ब्युरो

Dr. Neelam Gorhe : पिंपरी : मावळ तालुक्यात अनेकांनी लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे नाटक केले. आज, मात्र त्यांची अवस्था 'खूप मारल्या गप्पा आणि कुठे गेले ...' अशी झाली आहे, असे शरसंधान शिवसेना (Shiv Sena) उपनेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी शिंदे गटात गेलेले मावळचे शिवसेना खासदार श्रीरंगअप्पा बारणे (Shrirang Barane) यांच्यावर त्यांचे नाव न घेता कार्ला, लोणावळा (ता. मावळ, जि. पुणे) येथे आज (ता.४) केले.

मावळवासीयांच्या भावनांचा विचार न करता ते शिवसेनेची मूळ विचारधारा सोडून गेले आहेत. मात्र, शिवसैनिक भक्कम असल्याने त्याचा कोणताही विपरित परिणाम शिवसेनेवर होणार नाही असे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी ठणकावून सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शिवसेना महिला आघाडी आणि युवासेना आयोजित 'बये दार उघड' मोहिमेची सांगता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या श्रध्दास्थानी असलेल्या एकविरादेवीच्या दर्शनाने केल्यानंतर त्या बोलत होत्या.

शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, युवासेना पदाधिकारी शीतल शेठ, स्त्री आधार केंद्रप्रमुख विश्वस्त जेहलम जोशी, शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, पुणे महिला आघाडीच्या कल्पना थोरवे, जिल्हा संघटिका शैला खंडागळे. तालुका संघटिका अनिता गोणते, कामशेत शहर संघटीका उषा इंगवले, देहू शहर संघटिका, वेहेरगावच्या सरपंच अर्चना संदीप देवकर आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

राज्यातील साडेतीन शक्तीपीठासह ६१ देवींच्या मंदिरात बये दार उघड ही मोहिम नवरात्रोत्सवात घेण्यात आली. महिलांशी सशक्त, समृद्ध मैत्री व्हावी आणि त्यासाठी देवीने ताकद द्यावी या उद्देशातून ती घेण्यात आली, असे डॉ. गोऱ्हे यांनी याप्रसंगी सरकारनामाला सांगितले. एकविरा देवस्थानच्या प्रलंबित प्रश्नी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात पाठपुरावा करणार आहे, असे त्या म्हणाल्या.

त्यासाठी लवकरच विधिमंडळात बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पुढच्या वर्षीच्या नवरात्रात देवीच्या मूळ दागिन्यांसह पूजा व्हावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. या भागातील जमिनींच्या ताबाप्रश्नावर पीएमआरडीए पातळीवर बैठक लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT