Nilesh Lanke, Sunil Shelke News Sarkarnama
पुणे

Nilesh Lanke News : मराठा आमदार विधिमंडळाचे कामकाज बंद पाडण्याच्या तयारीत; लंकेंच्या वक्तव्याने खळबळ

Maratha Reservation News : निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता ध्यानात घेऊन त्यांनीही आता आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरविले आहे.

उत्तम कुटे

Pimpri-Chinchwad News : मराठा आरक्षण आंदोलन २५ तारखेपासून राज्यभर खूपच तीव्र झाले असून, त्यातून लॉ अॅन्ड ऑर्डरचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वच पक्षाच्या आमदार, खासदार, मंत्र्यांना मराठा समाजाने (Maratha Reservation) नो एन्ट्री केली आहे, तर दुसरीकडे समाजाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामासत्र सुरू केल्याने आता मराठा आमदारांवर समाजाचा दबाव वाढला आहे. त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता ध्यानात घेऊन त्यांनीही आता आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरविले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गावबंदी झाल्याने सर्वपक्षीय नेत्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यावर या बंदीचा सामना करावा लागू शक्तो म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) हे आपले दौरे आणि कार्यक्रम रद्द करण्याच्या बेतात आले आहेत. त्यांची आमदारकीची पहिलीच टर्म असली, तरी प्रत्येक अधिवेशन त्यांनी गाजवले आहे. आक्रमक आमदार अशी प्रतिमा असलेले शेळके हे स्थानिक तथा भूमिपुत्रांच्या प्रश्नी आपल्याच सरकारच्या विरोधात गेलेले आहेत.

तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) एमआयडीसीतील बंद केलेल्या जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांसाठी त्यांनी राज्य सरकारला नुकतेच ललकारलेले आहे. या कामगारांच्या पुनर्वसनासाठी एमआयडीसी बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आता, तर समाजाचाच प्रश्न असल्याने त्यांनी आपले दौरे व कार्यक्रमच रद्द करण्याचे ठरविले असल्याचे समजले.

समाजाच्या वाढत्या रेट्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी २४ तारखेला सुरू केलेली युवा संघर्ष यात्रा काल (ता.२७) थांबवली. समाजाच्या या वाढत्या रेट्यातून सत्ताधारी मराठा आमदारच आता राज्य सरकारला ललकारू लागले आहेत. त्यातून अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी राज्य विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याचा इशारा शनिवारी दिला.

त्यामुळे हे अधिवेशन वादळी होण्याचे संकेत मिळाले. कार्ला (ता. मावळ) येथे मराठा तरुण समाजाच्या आरक्षणासाठी चक्री उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आले असता लंकेनी सत्ता, राजकारण हे नंतर पहिला समाज असतो. म्हणून समाजाच्या आमदारांना आरक्षण देण्यासाठी निर्णयाच्या भूमिकेत यावेच लागणार आहे, असे सांगितले. त्यांना मात्र विरोध न करता येऊ देण्यात आले हे विशेष.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT