NivrutiAnna Gaware-MLA Ashok Pawar Sarkarnama
पुणे

पंचाहत्तरीतील निवृत्तिअण्णा गवारेंच्या विरोधात यंदा आमदार पवारांनी ठोकला शड्डू!

पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी आमदार अशोक पवार यांनी गुरुवारी (ता. २ डिसेंबर) आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

भरत पचंगे

शिक्रापूर (जि. पुणे) : हॅट्‌ट्रीक केलेल्या निवृतीअण्णा गवारे यांनी चौथ्यांदा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या गवारे यांचा सामना या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार (Ashok pawar) यांच्याशी होणार आहे. आमदार पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. कारण आंबेगाव, बारामती, भोर, खेड, पुरंदर, इंदापूरप्रमाणे आमदार-जिल्हा बॅंकेचे संचालक या रांगेत बसण्याची मार्चेबांधणी पवार यांनी फार अगोदरपासूनच केलेली आहे. (NivrutiAnna Gaware will contest against Ashok Pawar in Pune District Bank elections)

शिरूरच्या राजकारणात आमदार पवारांचे कट्टर विरोधक, भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे काही कारणांमुळे तेवढे सक्रीय नाहीत. जिल्हा बॅंकेच्या राजकारणात कायम धडपडणारे माजी सभापती मंगलदास बांदल सध्या कारागृहात आहेत. तीनवेळा संचालक राहिलेले आणि पंचाहत्तरीत पोचलेले गवारे अशी काहींशी पोषक परिस्थिती आमदार अशोक पवारांना सध्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आहे. मात्र, एकूण सोसायटी मतदार संघातील (अ वर्ग) १३१ मतांपैकी शिरूर-आंबेगावमधील ५० मते आणि इतर गोष्टींमुळे शिरूरमध्ये चमत्कारीक निकालाचीही चर्चा अधूनमधून रंगते. दरम्यान, गवारे यांनी अशोक पवारांच्या अगोदर बुधवारी (ता. १ डिसेंबर) आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर अशोक पवार यांनी आज (ता. २ डिसेंबर) आपला अर्ज भरला आहे.

शिरूर तालुक्यातील सोसायटी मतदार संघातील (अ वर्ग संस्था) मतदारयादीतील एकुण १३२ पैकी एक मत बाद झाले असून १३१ जणांना मतदानाचा अधिकार आहे. आमदार अशोक पवार यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक या वर्षी भलतीच चर्चेत आहे. खरे तर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील विद्यमान आमदार हेच जिल्हा बॅंकेचे संचालक आहेत. त्यात आंबेगाव, बारामती, भोर, खेड, पुरंदर, इंदापूर या तालुक्यांचा समावेश आहे. शिरुरमध्ये मात्र अशोक पवार हे जिल्हा बॅंकेचे संचालक नव्हते. त्यामुळे तसा प्रयत्न त्यांनी यंदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुरू केला आहे.

तब्बल ४१ हजार मताधिक्क्यांनी विजयी झालेले आमदार अशोक पवार यांनी संपूर्ण तालुक्यावर आपला पक्की मांड बसवली आहे. त्यांच्या विरोधात जाण्याची त्यांच्या पक्षात सध्यातरी कोणाचीही हिम्मत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर समर्थकांच्या अपेक्षेनुसार आमदारांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. आमदार अशोक पवार यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून संतोष जगताप, तर अनुमोदक म्हणून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष संतोष रणदिवे यांनी सह्या केल्या आहेत. अर्ज भरताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्रबापू काळे, सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, दिलीप मोकाशी, राजेंद्र जगदाळे, शशिकांत दसगुडे, बाबासाहेब फराटे, पंडित दरेकर, राजेंद्र नरवडे, स्वप्नील गायकवाड, विश्वास ढमढेरे, राजेंद्र खांदवे, भाऊ वारघडे, सचिन पवार, आण्णा महाडीक, नरेंद्र माने, रमेश मेमाणे आदींसह शेकडो समर्थक उपस्थित होते.

गायकवाड, काळे यांचेही अर्ज दाखल

जिल्हा बॅंकेसाठी शिरूरमध्ये सध्या तरी आमदार अशोक पवार यांचे पारडे जड मानले जाते. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष मर्जी असल्याने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून शिरूरमध्ये हस्तक्षेप होईल, अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे शिरूरमधून अशोक पवार आणि निवृत्तीअण्णा यांच्यात ही लढत होणार आहे. मागील निवडणूकीत पराभूत झालेले स्वप्नील अरुण गायकवाड आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे हे आमदार पवारांचा अर्ज भरताना उपस्थित होते. मात्र, त्या दोघांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत. हे दोघेही आमदारांच्या गोटातील असल्याने ते माघार घेण्याची जादा शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT