Pune Band Sarkarnama
पुणे

Pune Bandh : नुपूर शर्मांवर जी कारवाई झाली, तशी राज्यपालांवर का नाही? उदयनराजेंचा भाजपश्रेष्ठींना खडा सवाल

सरकारनामा ब्युरो

Pune Bandh : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यपालांनंतर भाजपच्या(BJP) नेत्यांकडूनही महापुरुष, समाजसुधारकांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली. महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांविरोधात आज पुण्यात बंद पाळण्यात आला. संपूर्ण बंदला अनेक सामाजिक, व्यापारी संघटनांचा पाठिंबा राष्ट्रवादी(NCP) आणि शिवसेनेला(Shivsena) मिळाला.

संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि विरोधी पक्ष नेते, सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांनी या बंदात उत्स्फुर्त सहभाग घेतला. यादरम्यान मूकमोर्चाही काढण्यात आला. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन या मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मोर्चात सर्वपक्षीय नेतेही सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना भाजप पुरस्कृत खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र सरकारवरच निशाणा साधला. भाजपच्या महिला प्रवक्ता नुपूर शर्माला(Nupur Sharma) जो न्याय मिळाला तोच कोश्यारींना का नाही, असा सवाल केंद्र सरकारला केला आहे. जून २०२२ मध्ये नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होते. त्यानंतर भाजपने शर्मा यांचा राजीनामा घेतला. काही फुटकळ, तुटपुंजे, विकृत लोक कारण नसताना महाराजांचा अपमान करतात. ज्यांनी स्वराज्यासाठी एवढं योगदान दिलं त्यांचा सन्मान केला पाहिजे हे सांगण्याची वेळ येते ही शोकांतिका आहे. पक्ष नंतरचा भाग आहे. पण नुपूर शर्माच्या बाबतीत जी शिस्तभंगाची कारवाई केली नाही, ती राज्यपालांवर का केली नाही, असा सवाल उदयनराजे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विचारला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वेचले, हे माहिती असतानाही शिवरायांचा सन्मान व्हावा, हे सांगण्याची आज वेळ येते ही शोकांतिका आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आज पुण्यातला बंद ही भावना फक्त माझी किंवा पुणेकरांची नाही तर संपूर्ण राज्यातल्या लोकांची आहे. असही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, रूपाली ठोंबरे , प्रदीप देशमुख, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, विकास पासलकर, मुस्लिम मूलनिवासी मंचाचे अंजुम इनामदार उपस्थित होते.

हा मोर्चा लाल महाल येथे आल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, आज दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व दुकाने बंद, मेडिकल स्टोअर्स सुरू राहणार आहे. तर, आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि व्यापाऱ्यांना बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो, असे सांगत फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे (एफएटीपी) चे अध्यक्ष फतेहचंद रांका यांनीदेखील या बंदला पाठिंबा देत बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना बंद पाळण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे या बंद दरम्यान, सर्व दुकाने आणि कार्यालये दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT