Omraje Nimbalkar  Sarkarnama
पुणे

Omraje Nimbalkar : ओमराजेंच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा! ठाकरेंचे आमदार मनधरणीला येताच दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने!

Shivsena Eknath Shinde Vs UBT : या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना वरुण सरदेसाई यांनी ओमराजेंबाबत लागलेला निकाल अपेक्षित नव्हता असे सांगत, निकालानंतर त्यांच्या कुटुंबाला धक्का बसल्याने आपण पक्ष सचिव म्हणून त्यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले.

Sudesh Mitkar

Pune News 21 Jun : शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बोलले जात असतानाच, मध्यरात्री पुण्यात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या.

ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्याच्या निवासस्थानी मध्यरात्री ठाकरे गटाकडून थेट 'मातोश्री'चे दूत दाखल झाले आणि तिथूनच या हाय व्होल्टेज ड्राम्याची सुरुवात झाली. मध्यरात्री ठीक १ वाजता ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव वरुण सरदेसाई हे तातडीने मुंबईवरून पुण्यात ओमराजे यांच्या निवासस्थानी पोहोचले.

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात वेगाने चक्र फिरली असून, ओमराजेंनी पक्षाला रामराम ठोकू नये यासाठी ठाकरे गटाकडून थेट मध्यरात्रीच 'ऑपरेशन मनधरणी' सुरू करण्यात आले. दोन्ही नेत्यांनी ओमराजेंच्या घरात जाऊन त्यांच्याशी गुप्त खलबतं केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा अत्यंत महत्त्वाचा निरोप घेऊन हे दोन्ही शिलेदार ओमराजेंच्या दारात पोहोचले होते.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना वरुण सरदेसाई यांनी ओमराजेंबाबत लागलेला निकाल अपेक्षित नव्हता असे सांगत, निकालानंतर त्यांच्या कुटुंबाला धक्का बसल्याने आपण पक्ष सचिव म्हणून त्यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले. ज्या गोष्टींवर चर्चा झाली, ती उघड करायची असती तर मध्यरात्री चोरून भेटलो नसतो, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला.

ओमराजे आजही ठाकरे गटाचेच खासदार असून २० वर्षे ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला, त्यांना न्याय मिळाला नसल्याची खंत आमदार कैलास पाटील यांनी बोलून दाखवली. उद्धव साहेबांचा निरोप आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवला असून ओमराजेंची साहेबांप्रति असलेली निष्ठा कायम आहे, त्यामुळे ते पक्षातच राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, ओमराजेंनी 'उद्याचा एक दिवस द्या, मग ठरवतो' असे सांगितल्याचेही पाटील यांनी सांगितले.

ठाकरे गटाचे नेते मध्यरात्री ओमराजेंच्या घरी पोहोचल्याची कुणकुण लागताच राजकीय पारा आणखी वाढला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तात्काळ ओमराजेंच्या घराबाहेर गोळा झाले. ठाकरे गटाचे नेते दबावाचे राजकारण करू नयेत म्हणून शिंदेसेनेकडून ओमराजेंना एकप्रकारे रात्रीतूनच सुरक्षा कवच पुरवण्यात आले. युवासेनेचे सचिव किरण साळी यांनी ठाकरे गटावर ओमराजेंना मध्यरात्री भेटण्याची वेळ का आली, असा सवाल त्यांनी केला.

तसेच, वेळ पडली तर आम्ही स्वतः ओमराजेंसोबत धाराशिवला जाऊ, अशी भूमिका शिंदेसेनेच्या युवासेनेने घेतली. या सर्व नाट्यमय घडामोडींनंतर खासदार ओमराजे निंबाळकर आज सकाळी ८ ते 9 दरम्यान पुण्यातून धाराशिवच्या दिशेने रवाना होतील. पवनराजे हत्याकांड प्रकरणाच्या निकालानंतर ते पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात जात आहेत. काल रात्री झालेल्या मनधरणीच्या नाट्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्यांच्या पुढच्या पावलाकडे लागले आहे.

आज दुपारी ४ वाजता धाराशिवमध्ये ओमराजे आपल्या कार्यकर्त्यांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक घेणार आहेत. या बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेतल्यानंतर ओमराजे निंबाळकर आपली अंतिम राजकीय भूमिका अधिकृतपणे स्पष्ट करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT