

Kalyan Land Scam : कल्याणमधील एका अत्यंत वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणाने आता मोठं राजकीय वळण घेतलं असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा उपशहरप्रमुख सुनील वायले यांच्यासह सात जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्यासह फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि संगनमत अशा विविध गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे.
कल्याण येथील खडकपाडा पोलिस (Police) ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, उंबडे गावातील एका जमिनीच्या व्यवहारात आरोपींनी तीन मृत व्यक्तीच्या नावाने बनावट घोषणापत्र तयार केले. इतकेच नव्हे तर संबंधित व्यक्ती जिवंत असल्याचे दाखवून तिच्या नावावरून जमीन हस्तांतरण करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात तब्बल 126 गुंठे जमिनीच्या खरेदीत हा मोठा गैरव्यवहार झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हायप्रोफाइल राजकीय प्रकरणाने कल्याणच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ असून, पोलिसही चक्रावले आहे.
या प्रकरणी फिर्यादी (Crime) प्रमोद विश्वनाथ गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 8 मार्च 2022 ते 18 जून 2026 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून संपूर्ण जमीन व्यवहारात बनावट कागदपत्रांचा वापर करत मोठी फसवणूक केली. फिर्यादी हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याची माहिती असतानाही त्यांच्याशी अन्यायकारक वागणूक देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे, त्यामुळे या प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्यात निर्मला रविकांत वायले, अलका मनोहर वायले, सुनील राजाराम वायले, किसान नधू वायले, शिरीष ढवकी, सुनील मोहनदास हीरचंदानी आणि जिगी लालचंदानी यांच्यासह एकूण सात जणांचा समावेश असून सर्वांविरोधात गंभीर कलमांखाली कारवाई सुरू करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, संपूर्ण जमीन व्यवहारासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेत संबंधित यंत्रणांची दिशाभूल करण्यात आली. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून जमीन व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, मालकी हक्काशी संबंधित पुरावे आणि तक्रारीतील प्रत्येक मुद्द्याची सखोल चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक सुनील वायले याने सर्व आरोप साफ फेटाळून लावले आहेत. राजकीय आणि आर्थिक हेतूने आपल्याला मुद्दाम या प्रकरणात अडकवले जात असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला. तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सुनील वायले याने स्पष्टीकरण देताना सांगितले की, संबंधित जमीन आम्ही जयंती भोईर यांच्याकडून पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने विकत घेतली आहे. गायकवाड कुटुंबाशी आमचा कोणताही व्यवहार झालेला नाही. आमच्याकडील सर्व कागदपत्रे वैध असून आम्ही न्यायालयीन मार्गाने कायदेशीर लढा देणार आहोत.
या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातील जमीन व्यवहारांमधील पारदर्शकता, बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून होणारे व्यवहार आणि कायदेशीर प्रक्रियेतील त्रुटी यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता पोलिस तपासातून नेमकी सत्यस्थिती काय समोर येते, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.