Crime

 

Sarkarnama

पुणे

PSI साठी 70 हजारांची लाच घेणारा पंटर 'एसीबी'च्या जाळ्यात

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (IPS Krishna prakash) काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : एका तरुणा विरुद्धच्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी चाकण पोलिस ठाण्यातील (chakan Police) पोलिस उपनिरीक्षकाने (PSI) सत्तर हजार रुपयाची लाच मागितली. तर, त्याच्यावतीने ती घेणाऱ्या `पंटर`ने (खासगी इसम) त्यात स्वताचे १५ हजार असे एकूण ८५ हजार रुपये लाच बुधवारी (ता.२९ डिसेंबर) रात्री पोलिस ठाण्यातच घेतली. पिपंरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Police Commissioner Krishna Prakash) आपल्या खाक्यानुसार या लाचखोर पीएसआय़ला निलंबित करण्याची दाट शक्यता आहे.

सोमनाथ झेंडे असे या पीएसआयचे नाव आहे. तर, त्याच्या वतीने अख्तर शेखावत अली शेख (वय ३५) याने ही लाच काल घेतली. दरम्यान, झेंडे हा तपासासाठी बाहेरगावी गेल्याने त्याला अटक झालेली नाही. मात्र, शेख याला पकडण्यात आले आहे. याप्रकरणी एका २७ वर्षीय तरुणाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दिली होती. त्याच्याविरुद्ध चाकण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्यावर कारवाई न करण्यासाठी झेंडे याने सत्तर हजार रुपयांची मागणी केली. त्यात शेख याने स्वतासाठी १५ हजार घ्यायचे ठरविले. त्यामुळे एकूण ८५ हजार रुपये त्याने तक्रारदार तरुणाकडे मागितले. मात्र, त्याला लाच द्यायची नव्हती. म्हणून त्याने एसीबीत तक्रार दिली. तिची खातरजमा करण्यात आल्यानंतर काल पोलिस ठाण्यातच हा ट्रॅप लावण्यात आला होता.

पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे आणि अतिरिक्त अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. कुणी राज्य शासकीय कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास १०६४ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीचे पोलिस उपअधिक्षक (प्रशासन) श्रीहरी पाटील यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT