Pimpri Chinchwad BJP Sarkarnama
पुणे

भाजपचा ऑनलाईन सभेचा अट्टाहास अन् विरोधकांची कोंडी

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑनलाईन सभेचा सोमवारी (ता.२०) फज्जा उडाला. स्क्रीन न दिसणे, आवाज ऐकू न जाणे व ऐकू न येणे अशा तांत्रिक अडचणीमुळे संतप्त विरोधकांनी सभाध्यक्ष महापौर उषा ढोरे यांना प्रत्यक्ष घेराव घातला. त्यामुळे सभा दहा मिनिटांसाठी स्थगित करण्याची वेळ त्यांच्यावर आली. विरोधकांचे माईक बंद करून सत्ताधारी भाजप रेटून काम नेत असल्याचा आरोप करण्याची आयती संधी विरोधकांना चालून आली.

कोरोनामुळे सध्या पालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक तर पालिकेची सर्वसाधारण मासिक सभाही ऑनलाईन होत आहे. याव्दारे काम करण्यास मोठा अडथळा सुरवातीपासून येत आहे. परिणामी, पुणे महापालिकेने आपली महासभा ऑफलाईनने घेण्याची विशेष परवानगी नुकतीच घेतली. विरोधकांनी मागणी करूनही पिंपरी पालिकेत सध्या ऑनलाईन पद्धतीनेच सभा होत आहेत. त्यात तांत्रिक अडथळा वरचेवर येतो आहे. त्यामुळे सभेचे काम व्यवस्थित होत नाही. विनाचर्चा प्रस्ताव मंजूर होत आहेत. त्याचा कळस आजच्या मासिक सभेत झाला.

स्थायी समिती सभापती तथा अध्यक्षपदासाठी इच्छूक असलेले भोसरीतील भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांना ती संधी मिळाली नाही. म्हणून त्यांनी नाराज होऊन स्थायी सदस्यत्वाचा लगेचच राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपशी संलग्न पाच अपक्ष नगरसेवकांचे गटनेते कैलास बारणे व दोन भाज नगरसेविकांचे पती संतोष बारणे व राजू लोखंडे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला.

गेल्या साडेचार वर्षात संधी न मिळालेल्या आणखी काही नगरसेवकही राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.त्यांनी आपली नाराजी जाहीररित्या प्रकटही केली आहे.त्यात भाजपचे अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा अजित पवार यांनी नुकताच केला. त्यामुळे महापौरांनी रवी लांडगेचा स्थायीचा राजीनामा मंजूर केल्यानंतर त्यांच्या जागी पुन्हा भोसरी वा चिंचवडमधील सदस्याला भाजपने संधी दिली नाही. तर त्याऐवजी भाजपच्या शहर कारभारी आमदारांनी आऊटगोईंगच्या भीतीतून गेल्या साडेचार वर्षात संधी न मिळाल्याने नाराज असलेल्या पिंपरी मतदारसंघातील नगरसेविका सुजाता पालांडे यांना स्थायीचे सदस्य तीन महिन्यांसाठी का होईना नाईलाजाने केले.

त्यांचे नाव महापौरांनी जाहीर केल्यानंतर ऑनलाईनची तांत्रिक समस्या उभी राहिली, हे विशेष. त्यामुळे आपापल्य़ा दालनातून या ऑनलाईन सभेत सहभागी झालेले राष्ट्रवादी व शिवसेनेचे नगरसेवक यांनी महापौर कक्षाकडे धाव घेतली. त्यांना सुरक्षा रक्षकांनी दारात अडवताच बाचाबाची झाली. नंतर आत घुसलेल्या या नगरसेवकांनी महापौरांना घेराव घालून जाब विचारला. अशारितीने ऑनलाईन सभेत ऑफलाईन गोंधळ झाला.परिणामी आपल्या दालनातून सभेचे कामकाज करणाऱ्या महापौरांनी सभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली.

त्यानंतर पुन्हा कामकाज सुरु होताच नदी सुधारणेसाठी स्मार्ट सिटीरप्रमाणे स्वतंत्र कंपनी (एसव्हीपी) स्थापन करण्याचा विषय विरोधकांचा विरोध नोंदवून मंजूर करण्यात आला. तो करताना भाजपला त्यांच्याच नगरसेवकाने घरचा आहेर दिला होता. त्याकडेही दूर्लक्ष करण्यात आले. भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी नदी सुधार कंपनीसाठी एनजीटीची (राष्ट्रीय हरित लवाद) मान्यता घेतली नसतानाही त्याचे टेंडर काढण्यात आले, याकडे लक्ष वेधले. पैसे खाण्यासाठीच ते काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या कामाचे पहाटे भुमीपूजन केले. सगळा भोंगळ कारभार सुरु असून स्मार्ट सिटी कंपनीतही काय चाललं आहे, ते कळत नाही, असा घरचा आहेर त्यांनी आपल्या भाषणात दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT