Murlidhar Mohol Sarkarnama
पुणे

Murlidhar Mohol : पुणे विमानतळाच्या 'या' मुद्द्यावरून मुरली अण्णा विरोधकांच्या रडारवर

Sudesh Mitkar

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन झाल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर हे सुरू झाले आहे. याबाबत विरोधकातून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील या दिरंगाईबाबत आंदोलन करण्यात आले. आता काँग्रेसने देखील या मुद्द्यावरून हल्लाबोल केला आहे. या मुद्द्याच्या अनुषंगाने नव्याने या खात्याचे केंद्रीय मंत्री झालेले भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत आहे.

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लोहगाव विमानतळावर येथे टर्मिनल 2 उभे केले. परंतु, ते चालू करण्यास सत्ताधारी भाजपने एक वर्षाचा विलंब लावला त्यामुळे विमान प्रवाशांना त्याचा नाहक त्रास झाला, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांमुळे आणि माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रेरणेने पुण्यात आयटी हब उभे राहिले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग (Manmohan Singh) यांनी या प्रकल्पाला चालना दिली. तसेच पुण्यात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी जवाहरलाल नेहरू शहर पुनर्निर्माण योजनेतून पुण्याला भर भक्कम निधी दिला. यामुळे उद्योजक, मोठे व्यवसायिक आणि पर्यटक पुण्याकडे आकर्षित झाले. यातून विमानसेवा विस्ताराची गरज वाढली. साधारणतः एक कोटी प्रवासी वर्षाकाठी प्रवास करू लागले. त्यांच्या सोयीसाठी टर्मिनल 2 उभारणीची गरज निर्माण झाली आणि ऑगस्ट 2023 मध्ये टर्मिनल 2 उभारणीचे काम पूर्ण झाले.

वास्तविक पाहता ऑगस्ट 23 मध्येच टर्मिनल 2 कार्यन्वित होणे अपेक्षित होते. विमानतळ प्रशासनाची त्या दृष्टीने तयारीही झाली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करून भाजपला एक 'इव्हेंट' साजरा करायचा होता. याकरिता पंतप्रधानांची तारीख मिळत नसल्याने साडेपाच हजार कोटी खर्चून उभे केलेले टर्मिनल अक्षरशः पडून होते. हे लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने 23 सालातील डिसेंबर महिन्यापासून टर्मिनल सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला. तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्यजी शिंदे यांना पत्र पाठविली, निवेदने दिली.

दिनांक 20 डिसेंबर 23 रोजी नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र पाठवून टर्मिनल उद्घाटनात टाळाटाळ होत असल्याचा निषेध केला, आंदोलन केले. त्या आंदोलनाला यश मिळाले आणि मंत्र्यांनी विमानतळाची पहाणी करून 19 फेब्रुवारी रोजी उद्घाटन होईल, असे जाहीर केले. पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या तयारीसाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी डिसेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात अधिकाऱ्यांची बैठकही घेतली.

पंतप्रधान मोदी यांना ही तारीख सोयीची नसल्याने उद्घाटनाचा 'मुहूर्त' पुन्हा एकदा टळला. त्यानंतर थोर समाजसुधारक कै. गणेश वासुदेव जोशी तथा सार्वजनिक काका यांच्या पुतळ्यासमोर दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने मा‍झ्या नेतृत्वाखाली घंटा नाद आंदोलन करण्यात आले आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. मार्च महिन्यात ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधानांनी टर्मिनलचे उदघाटन केले. पण, त्याचवेळी टर्मिनल लगेचच कार्यान्वित होणार नसल्याचे स्पष्ट झाले. पंतप्रधानांच्या उद्घाटन इव्हेंटचा काँग्रेस पक्षाने निषेध केला. काँग्रेस पक्षाने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सत्ताधारी भाजपला जाग आली आणि आता मोठ्या गाजावाजा करत टर्मिनल 2 कार्यान्वित करण्यात येत आहे, अशी टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT