Maharashtra Politics  Sarkarnama
पुणे

Ganga Bhagirathi Controversy: विधवा महिलांना गंगा भागीरथी म्हणण्यास विरोधी पक्षांचा नकार; काय आहे कारण?

Maharashtra Politics | विधवांसाठी गंगा भागिरथी हा शब्दप्रयोग करण्याची मागणी काही महिला संस्था आणि महिला आयोगाकडूनही करण्यात आली होती.

सरकारनामा ब्युरो

Pimpri-Chinchwad Political News: 'गंगा भागिरथी' असा शब्दप्रयोग विधवांसाठी करण्याचा राज्य सरकारचा विचार महिला बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकताच (ता.१२) बोलून दाखवला. त्यावर आता कडक प्रतिक्रिया येत असून हा विचार वेदनादायी असल्याने तो मागे घेण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गुरुवारी (१४ एप्रिल) केली. तर, तो देशाला दोनशे वर्षे मागे नेणारा असल्याची टिका आम आदमी पार्टीने (AAP) केली आहे. (Opposition parties refuse to call widows Ganga Bhagirathi; What is the reason?)

अपंगांना जसे दिव्यांग संबोधले जाते, त्या धर्तीवर विधवांसाठी गंगा भागिरथी हा शब्दप्रयोग करण्याचा प्रस्ताव तयार करण्यास सांगणारे पत्र मंत्री लोढा यांनी आपल्या महिला व बालविकास विभागाला नुकतेच लिहिले.तशी मागणी काही महिला संस्था आणि महिला आयोगाकडूनही झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान,राज्य सरकारचा हा विचार वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया खा.सुळे यांनी दिली आहे. पती गमावलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, शासन हा जो काही वेगळा विचार करीत आहे, तो घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो,असे त्या पुढे म्हणतात. त्यामुळे तो मागे घेण्याची आग्रहाची मागणी त्यांनी केली. महिलांच्या बाबतीतील हा अतिशय संवेदनशील विषय हाताळताना व त्यासंबंधी मोठा निर्णय घेत असताना त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था,संघटनांना विश्वासात घेऊन व तो निर्णय घेतला पाहिजे,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra Politics)

देशाला दोनशे वर्षे मागे नेणारा हा विचार

विधवांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांना 'गंगा भागिरथी' (गं. भा.) हा शब्द वापरण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाला `आप`ने ही आक्षेप घेत त्याचा निषेध केला.हा देशाला दोनशे वर्षे मागे नेणारा विचार असल्याची टीका या पक्षाच्या नेत्या सीता केंद्रे यांनी आज केली.दोनशे वर्षांपूर्वी सती प्रथेविरुद्ध राजाराम मोहन रॉय यांनी लढाई लढली होती. कारण त्या काळी विधवेला 'गंगा भगीरथी' नावाने अपमानित केले जात असे. यासंदर्भात मागच्याच वर्षी अशा कुप्रथा पाळल्या जाऊ नयेत, असे ठराव ग्रामपंचायतीने करावेत, असा प्रयत्न झाला आणि आता खुद मंत्री महोदयांनीच 'गंगा भगीरथी' चा उलट्या प्रवासाचा प्रस्ताव आणला, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT