Pune News : जम्मू-काश्मिरमधील पहलगामध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या असं काही पीडित कुटुंबांकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक विधान केलेलं आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील याबाबत दोन मतप्रवाह असल्याचे देखील सांगितले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''जे पाकिस्तानी नागरिक व्हिसा घेऊन आपल्या देशात आले आहेत. त्यांची माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. त्यांची ओळख पटवून, त्यांना भारत सोडण्याबाबतची नोटीस दिलेली आहे. त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली असून पाकिस्तानी नागरिकांना पाठवलं जात आहे. जे पाकिस्तानी नागरिक व्हिसा घेऊन आले आहेत, त्यांना 48 तासांत देशातून बाहेर काढायचे आहे. यासाठी पोलीस प्रशासन वेगाने काम काम करत आहे.''
तसेच ''देशाच्या सुरक्षेचा आणि अस्मितेचा प्रश्न येतो तेव्हा काही कडक निर्णय घ्यावे लागतात. पाकिस्तानला हे कळणं गरजेचं आहे की त्यांची निर्भरता भारतावर आहे. पाकिस्तान दहशतवादाला समर्थन देतो आणि मानवतेचा खून करतो, त्यामुळे आज जगातील कुठलाही देश त्यांच्यासोबत उभा राहू शकत नाही, ही पाकिस्तानची परिस्थिती झाली आहे.'' असंही फडणवीसांनी सांगितलं.
याशिवाय, पाकिस्तानकडून आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे अशा धमक्या देण्यात येत आहेत. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, पाकिस्तानकडे खायला देखील पैसे नाहीत, कशाचा न्युक्लिअर बॉम्ब सांगतात.. लोक उपाशी मरत आहेत, काय त्यांची अवस्था आहे, याबाबत सगळ्यांना माहिती आहे. असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.
तर देवेंद्र फडणवीस यांनी आज दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या जगदाळे आणि गणबोटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, तो अतिशय भावूक प्रसंग होता. काहीच शब्द नव्हते. आसावरी जगदाळे यांनी पहलगाम येथील अनुभव सांगितल्यानंतर, ते ऐकून कुणाचेही मन हेलावून जाईल आणि रक्त पेटेल, असे ते वर्णन होते. गणबोटे आणि जगदाळे कुटुंबासोबत घडलेली घटना अनाकलनीय होती. त्यांचा अनुभव ऐकल्यावर दहशतवादाशी लढण्याचा निर्धार आणखी मजबूत झाला आहे. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सरकार हवी ती मदत करणार आहे.''
2040 पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार, बावनकुळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता फडणवीस म्हणाले, 100 वर्षे मला मुख्यमंत्री ठेवतील. मात्र बाकी राजकारणात रोल बदलत असतात. ते बदलले पाहिजे, कुणी फार काळ एकाच पदावर राहत नाही. त्यामुळे जेव्हा माझा रोल बदलायचा तेव्हा तो बदलेल.
काही पीडित कुटुंब धर्म विचारून गोळ्या घातल्या असल्याचं सांगत आहेत मात्र याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबतची सत्यता माहीत नाही असं वक्तव्य केले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील काही लोक धर्म विषारी गोळ्या घातल्या असे म्हणत आहेत. तर काही याबाबत नकार देत आहेत. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, कोण काय म्हणाले याच्या वादात मला पडायचं नाही. ही वाद करण्याची वेळ नाही पीडितांच्या कुटुंबीयांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत त्यांनी बघितले ते मांडले आहे. त्यामुळे ज्यांना मान्य करायचं असेल ते मान्य करतील. त्यांना डोळे उघडे ठेवूनही झोपेचं सोंग घ्यायचं असेल ते घेतील. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले मात्र पुढे त्यांनी या दोन्ही नेत्यांची वक्तव्यं आपण ऐकली नसल्याचे देखील सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.