Supriya Sule & Devendra Fadanvis Sarkarnama
पुणे

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ला बाधित कुटुंबियांसाठी सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Supriya Sule letter to cm Devendra Fadnavis Pahalgam Terror Attack:पहलगाम दहशतवादी हल्ला घटनेत या कुटुंबांनी जे गमावले याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही पण तरीही या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय सेवेत सामावून घ्यावे.

Sudesh Mitkar

Pune News : जम्मू कश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. या कुटुंबीयांचा नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा अशी देखील मागणी सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरीकांची हत्या करुन दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. अतिरेक्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने (सर्व राहणार डोंबिवली), दिलिप डिसले (पनवेल), कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे या पुण्यातील रहिवाशांता मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे देशातील जनमानसात संताप आहे. ही घटना भारतीयत्वावर हल्ला असून या दहशवादी कारवाईचा निषेध करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी नागरीक एकजूट झाले आहेत. आम्ही सर्वजण एक देश म्हणून भारत सरकारच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत. या घटनेचा वृत्तांत ऐकूनच अंगाचा थरकाप उडतो मग प्रत्यक्ष अनुभवलेल्या नागरीकांची काय स्थिती असेल याची कल्पनाही करवली जात नाही.

आपल्या घरातील कर्ते पुरुष अतिरेकी अगदी टिपून-टिपून मारत असताना इतर कुटुंबियांनी या कठीण प्रसंगाचा धीरोदात्तपणे सामना केला. या संपूर्ण घटनेत त्यांनी दाखविलेली हिंमत अतिशय मोलाची आहे. आपली जीवाभावाची माणसं डोळ्यांदेखत मारली जात असताना अशी हिंमत दाखविणे सोपे नाही.

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ६ जणांच्या कुटुंबीयांना या १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'नागरी शौर्य' पुरस्काराने गौरविण्यात यावे. या घटनेत या कुटुंबांनी जे गमावले याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही पण तरीही या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय सेवेत सामावून घ्यावे. संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी या उच्चशिक्षित असून त्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेता येणे शक्य आहे.

याच धर्तीवर इतर पिडीतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेता येईल. या कृतीद्वारे या शूर कुटुंबियांना महाराष्ट्रातील जनता सदैव आपल्यासोबत उभी आहे असा विश्वास शासनाने द्यावा, ही नम्र विनंती, असे या पत्रात म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "पहलगाम येथील भ्याड अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांच्या कुटुंबीयांनी हिंमतीने संपूर्ण प्रसंगाचा सामना केला. म्हणूनच त्यांना येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'नागरी शौर्य' पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे. यासोबतच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे पत्राद्वारे केली आहे. मला खात्री आहे की ते या विनंतीचा नक्कीच विचार करून यावर सकारात्मक निर्णय जाहीर करतील,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT