Jayant Patil Exclusive Interview : संख्याबळ कमी, तरीही लढत राहणार!

Jayant Patil Views ON Ajit Pawar vs Sharad Pawar: उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक जास्त झाले आहे. त्यामुळे सत्ता प्रिय असणारे तिकडे जात आहेत आणि ज्यांना विचार प्रिय आहेत ते शरद पवार यांच्यासोबत इथे थांबले आहेत.
Jayant Patil Sarkarnama Exclusive Interview NEWS
Jayant Patil Sarkarnama Exclusive Interview NEWSSarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil Sarkarnama Exclusive Interview : विधानसभेमध्ये विरोधकांचे संख्याबळ मोजके आहे. मात्र, मोजक्या संख्याबळासह सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवीत राहणार. त्याचबरोबर विचारांच्या बळावर संघटनेची बांधणी करत असून, संघर्ष सुरूच राहणार आहे, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

 लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय स्थितीकडे आपण कसे पाहता?

जयंत पाटील - २०२४च्या लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’ची घोषणा करणाऱ्या भाजपला २५० जागांचाही आकडा गाठता आला नाही. परिणामी नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू आणि अन्य लोकांना सोबत घेऊन भाजपला केंद्रात सत्ता स्थापन करावी लागली. तर, नोव्हेंबर २०२४मधील विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठे बहुमत मिळाले. इतके की त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्या मित्र पक्षांचीही गरज वाटली नाही. एकंदरीत काय तर केंद्रात आणि राज्यात दोन्ही एकाच विचारांचे सरकार आले. त्यामुळे आपल्या राज्याचे चित्र वेगळे असायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. आज आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र मागे पडत आहे, कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे, भ्रष्टाचारात महाराष्ट्र पुढे आहे, राज्यात धार्मिक द्वेष पसरवला जातो आहे. राज्याची अशी परिस्थिती कधीच नव्हती.

 निवडणुकीत धार्मिक द्वेषाचे मोठे राजकारण झाले, असे वाटते का?

हो.. पण जाणीवपूर्वक असे वातावरण निर्माण केले जात आहे. सत्ताधारी पक्षातील सदस्य बेताल वक्तव्य करत आहेत. त्याचा थेट फटका महाराष्ट्राच्या शांततेला बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम ग्राउंड असलेल्या नागपुरात मागच्या महिन्यात मोठी दंगल उसळली. नागपूरचे लोक शांत स्वभावाचे आहेत, तरीही त्या ठिकाणी दंगल कशी होते? नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती, असं म्हणतात, मग प्रश्न तयार होतो की सरकार काय करत होते? २०२४ मध्ये देशात ५९ जातीय दंगली झाल्या. त्यातील १२ दंगली महाराष्ट्रात घडल्या आहेत. २०२२पासून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात जातीय दंगलींमध्ये वाढ झाली आहे. २०२४ मध्ये महाराष्ट्रात १२, गुजरात ५, मध्य प्रदेशात ५ आणि राजस्थानात तीन दंगली झाल्या. या दंगली का होतात? कशा होतात? या सर्वांत महाराष्ट्राचा आकडा एवढा वर जातोय. यातून किती अस्वस्थता आपण तयार केली आहे, यावर सरकारने काम करायला हवे.

Jayant Patil Sarkarnama Exclusive Interview NEWS
Indus Waters Treaty: काँग्रेसला सरदार पटेलांची आठवण! नेहरूंनी राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष करून केला सिंधू जल करार

या राजकारणाशी आपण व आपला पक्ष दोन हात कसे करणार?

आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि फक्त लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडू शकतो. ते आम्ही करत राहू. मात्र, हे सरकार निगरगट्ट आहे. कोणी कितीही ओरडले तरी दडपशाही, दमनशाहीचा उपयोग करून आंदोलन चिरडून टाकण्याचे ते काम करतात. लोकांच्या मूलभूत गोष्टींवर लक्ष देण्याव्यतिरिक्त ज्या औरंगजेबाला लोक विसरलेले होते, त्याचा वारंवार उल्लेख करून त्याची आठवण करून देत आहेत. कबर, कुणाल कामरा, दर्गा पाडणे अशा गोष्टींवर सरकार आपला मौल्यवान वेळ खर्च करत आहे. n  सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रयत्न करत आहेत? पुढील राजकारणात राष्ट्रवादीची वाटचाल कशी राहील? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संपूर्ण ताकदीनिशी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये उतरेल. हे सरकार सहा महिने झाले सरकारमध्ये आले आहे. पण या सहा महिन्यांत एकही चांगली गोष्ट झाली नाही. कधी बीड येथील सरपंच हत्याकांड, सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांड, स्वारगेट येथे झालेला बलात्कार किंवा नुकतेच यवतमाळ येथे पाण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू... सरकार येणाऱ्या प्रत्येक दिवशी बदनाम होत आहे.

कोणत्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारणे आवश्यक आहे आणि ते करण्याचे काम तुमचा पक्ष करत आहे?

सरकारला प्रत्येक गोष्टीचा जाब आम्ही विचारत आहोत, विचारत राहू. सत्ताधारी पक्ष म्हणाले होते, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू... कोरा कोरा कोरा असे एकदा सोडून तीनदा म्हणाले होते. आता म्हणतात ३१ तारखेच्या आत हप्ते भरा. आधी म्हणाले होते लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार, आता ते २१०० सोडा १५०० रुपये देणेही अनेक महिलांना बंद केले आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना फक्त ५०० रुपये मिळतील. सरकार किती फसवणूक करणार? विजेच्या नावावर फसवणूक, खतांच्या नावावर फसवणूक, हमीभावाच्या नावावर फसवणूक, हे सरकार सर्वच बाबतीत फसवणूक करत आहे.

 राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय?

राज्याच्या अर्थमंत्र्यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आजपर्यंत महाराष्ट्रात एवढ्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प कोणीच सादर केला नव्हता. रोज नवनवीन विक्रम करणाऱ्यांचा हाही एक विक्रमच म्हणावा लागेल. असो! पण गंभीर बाब मला इथे नमूद करायची आहे, ती म्हणजे २०२०-२१ साली सरकारवर ५ लाख १९ हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. यावर्षी ते ९ लाख ३२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. आपण महापालिकेलाही कर्ज देऊ शकत नाही ही आपली सध्याची परिस्थिती आहे. अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी आपला विकास वाढीचा दर १४-१५ टक्के हवा. पण सध्या तो केवळ ७.३% वर आहे. राजकोशीय तूट १ लाख १० हजार कोटींहून आता १ लाख ३६ हजार कोटी रुपयांवर गेली आहे.

कधी ना कधी तरी राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर होणारच आहे. त्यामुळे एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार, हा मोठा प्रश्न आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे. गुंतवणूक वाढली तर राज्यात रोजगार वाढेल, रोजगार वाढला तर आपोआप राज्यातील सामान्य माणसाची परिस्थिती सुधारेल आणि राज्यातील माणसांची प्रगती झाली तर राज्याची प्रगती आपोआपच होईल. मात्र, गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, तेव्हाच राज्यात गुंतवणूक वाढेल. सध्या राज्यात कायदा-सुव्यवस्था डळमळीत आहे.

राज्यात येणाऱ्या प्रत्येक दिवशी खून, हाणामारी, चोरी, दरोडा अशा विविध घटना ऐकायला मिळत आहेत. गुंडांचा प्रभाव वाढत आहे. कंपन्यांकडून खंडणी वसूल केली जात आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्याचे मुख्य कारण हे खंडणी हेच होते. अशा परिस्थितीत उद्योगधंदे वाढणार कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

तुमच्या पक्षातील नेत्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आकर्षण असल्याची चर्चा आहे. पडझड होऊ नये यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?

मी आपल्याला एक गोष्ट सांगतो सध्याचे राजकारण हे व्यक्ती किंवा विचारकेंद्री नसून सत्ताकेंद्री झाले आहे. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक जास्त झाले आहे. त्यामुळे सत्ता प्रिय असणारे तिकडे जात आहेत आणि ज्यांना विचार प्रिय आहेत ते शरद पवार यांच्यासोबत इथे थांबले आहेत.

पक्ष आणि संघटना वाढीसाठी काही नियोजन आहे का?

आमच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांची नुकतीच मुंबईत बैठक झाली. यावेळी त्यांच्या सूचना-मनोगत ऐकून घेतले. त्यावर आमचे काम सुरू आहे. योग्य वेळी पक्षाची रणनीती समोर आणली जाईल.

ज्या पद्धतीने भाजप संघटनात्मक बांधणी करत आहे, ते पाहता विरोधकांचा कितपत टिकाव लागेल?

तुमचा प्रश्न खरंच चांगला आणि खरा आहे. कारण आम्ही फक्त एका सत्ताधारी पक्षाविरुद्ध लढत आहोत, अशी गोष्ट नाही. आम्ही लढतोय भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे), सीबीआय, निवडणूक आयोग आणि इत्यादी केंद्रीय शासकीय सर्व यंत्रणांविरोधात. सत्ताधारी लोक सर्वांना हाताशी धरून ही लढाई लढत आहे. एकी पैसा, माणसे, यंत्रणा आणि दुसरीकडे फक्त विचारांना जागणारी माणसे अशी लढाई आहे. पण इतिहास साक्षीदार आहे, पैसा, संपत्ती, यंत्रणेच्या लढाईत विचारांचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही मूठभर मावळ्यांच्या जिवावरच लढाई केली. कारण त्यांच्या मागेही एक विचार होता तो म्हणजे स्वराज्याचा. त्यामुळे आम्ही संघर्ष करू.

Jayant Patil Sarkarnama Exclusive Interview NEWS
Political Horoscope: कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी उद्धव अन् राज यांच्या पत्रिकेतील योग एकत्र येण्यासाठी अनुकूल आहेत का?

महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. लाडक्या बहिणींच्या जिवावर हे लोक सत्तेत आले होते, त्यांचीही फसवणूक या सत्ताधाऱ्यांनी केली आहे. आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर हे सारे प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ.

थोड्या प्रमाणात शिल्लक राहिलेल्या विरोधी पक्षाला राज्याच्या विकासाच्या दृष्टीने न्यायाची वागणूक देण्याची आवश्यकता असतानाही त्यांची अडवणूक करण्याचे काम सध्या सुरू आहे. संख्याबळ कमी असले, तरी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे काम आम्ही करीत आहोत.

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती पाहिली, तर उद्योगधंदे येणे कठीण आहे. सरकार आज म्हणत आहे, की सर्व काही चांगलं आहे, वातावरण चांगले आहे. आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, पण हे उत्तर देऊन सरकार वेळ मारून नेऊ शकते पण परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com