अनिल सावळे
Pune News: बोपोडीतील कृषी विभागाच्या जमीन अपहार प्रकरणात खडक पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, शीतल तेजवानी आणि अमेडिया एंटरप्रायझेस कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांची नावे बोपोडी प्रकरणातील नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ही दोन नावे मुंढव्यातील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या जमीन गैरव्यवहाराशी संबंधित आहेत. महसूल विभागाने या दोन घटनांबाबत एकत्रित तक्रार दिल्यामुळे पोलिसांनी (Police) एकाच गुन्ह्यात नोंद केली होती, असे आर्थिक गुन्हे शाखेकडून स्पष्ट करण्यात आले.
मुंढव्यातील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच मुंढव्यातील जमिनीच्या प्रकरणात नायब तहसीलदार प्रविणा बोर्डे यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या अनुषंगाने तहसीलदार येवलेसह तेजवानी आणि अमेडियाचे दिग्विजय पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे.
मुंढवा परिसरातील सर्व्हे क्रमांक ८८ मधील १७ हेक्टर ५१ आर जमीन कुलमुखत्याधारक शीतल तेजवानीकडून अमेडिया अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीचे संचालक दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी विकत घेतली. या जमिनीचा ताबा मिळावा, यासाठी अमेडिया कंपनीचे संचालक पाटील यांनी तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्याकडे केला होता. त्यावर येवले यांनी ही जमीन रिकामी करावी, असे पत्र बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या कार्यालयास दिले होते. या प्रकरणात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
बोपोडीतील कृषी विभागाच्या मालकीची पाच हेक्टर ३५ आर जमीन आहे. शहरात मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ महापालिका क्षेत्रात लागू नसतानाही व्हीजन प्रॉपर्टीतर्फे कुलमुखत्यारधारक म्हणून अर्जदार हेमंत गावंडे यांच्या वतीने आरोपींनी संगनमत करून सरकारी जमिनीवर मालकी हक्क असल्याचा बेकायदेशीर आदेश तयार करून फसवणूक केली, अशी फिर्याद नायब तहसीलदार प्रविणा बोर्डे यांनी खडक पोलिस ठाण्यात दिली होती.
त्यानुसार तहसीलदार सूर्यंकात येवले, हेमंत गावंडे, राजेंद्र रामचंद्र विध्वंस, हृषिकेश माधव विध्वंस, मंगला माधव विध्वंस (रा. नवी पेठ), विद्यानंद अविनाश पुराणिक (रा. इंदूर, मध्यप्रदेश), जयश्री संजय एकबोटे (रा. कुलाबा, मुंबई), शीतल तेजवानी आणि अमेडिया एंटरप्रायझेसचे संचालक दिग्विजय पाटील यांनी या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तेजवानी आणि अमेडियाचे दिग्विजय पाटील ही दोन नावे ही मुंढवा प्रकरणाशी संबंधित आहेत, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली.
मुंढवा आणि बोपोडी जमीन प्रकरणात पोलिसांनी बावधन आणि खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु अद्याप एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तसेच, चौकशीला बोलावण्यात आलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
बोपोडी आणि मुंढवा येथील जागेबाबतच्या या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. या प्रकरणात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. तपास करण्यासाठी पुरावे गोळा करण्यात येत आहेत. महसूल विभागाकडून कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर कोणाची भूमिका काय आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- विवेक मासाळ, पोलिस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.