PCMC Election 2025 Mahesh- Landge Vs Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Mahesh Landge: भाजपच्या पहिलवान आमदारानं अजितदादांसमोर दंड थोपटले! पिंपरी-चिंचवडमध्ये 'अबकी बार 100 पार'

PCMC Election 2025 Mahesh Landge Vs Ajit Pawar: पीसीएमसीवर पुन्हा 'कमळ' फुलवण्यासाठी सज्ज आहोत. विकासकामांच्या जोरावर विजय मिळवू. 'अबकी बार 100 पार' हा आमचा नारा आहे. भोसरी मतदारसंघातून 40+ उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार महेश लांडगे यांनी केला आहे.

Sudesh Mitkar

Pune News:आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी महायुतीतील भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) यांच्यातील अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी 'अबकी बार शंभर पार'चा नारा देऊन अजित पवारांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी पुण्यातून देखील भाजपाने 125 नगरसेवक निवडून आणण्याचा टार्गेट ठेवलं आहे.

पिंपरी-चिंचवड हा अडीच दशकांहून अधिक काळ अजित पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 128 पैकी 77 जागा जिंकून सत्ता काबीज केली, तर राष्ट्रवादीला केवळ 36 जागांवर समाधान मानावे लागले. या विजयात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचा मोठा वाटा होता. जगताप यांच्या निधनानंतर लांडगे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि आता ते पुन्हा 'कमळ' फुलवण्यासाठी आक्रमक झाले आहेत.

अलीकडेच पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिकला बदली झाली आणि त्यांच्या जागी माजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला. या प्रशासकीय बदलानंतर महेश लांडगे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, जी व्हायरल झाली.

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पीसीएमसीवर पुन्हा 'कमळ' फुलवण्यासाठी सज्ज आहोत. 2014 पासून शहराच्या विकासासाठी काम करीत आहोत. विकासकामांच्या जोरावर विजय मिळवू. 'अबकी बार 100 पार' हा आमचा नारा आहे. भोसरी मतदारसंघातून 40+ उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.लांडगे यांचा हा नारा योगायोग आहे की अजित पवारांना मुद्दाम डिवचण्याचा प्रयत्न? यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

'दोन दादा' मधील सुप्त संघर्ष

महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वैर लपून राहिलेले नाही. लांडगे हे पूर्वी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, पण 2017 नंतर ते भाजपमध्ये गेले. दोघांमधील तणाव अनेकदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीतच उघड झाला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये पीसीएमसी पोलीस आयुक्तालयाच्या भूमिपूजनादरम्यान लांडगे यांनी फडणवीसांचे कौतुक केले, पण पवारांचा उल्लेख टाळला. यावर पवार यांनी, "जरा चांगल्याला चांगले म्हणायला शिका! मी पिंपरी-चिंचवडचा विकास केला, असे खडेबोल सुनावले होते.

भाजपची रणनीती, राष्ट्रवादीचा 'परिवार मिलन'

भाजपकडे पीसीएमसीमध्ये भोसरीचे लांडगे, चिंचवडचे शंकर जगताप (विधानसभा) आणि अमित गोरखे, उमा खापरे (विधानपरिषद) असे चार आमदार आहेत. हे सर्व निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. दुसरीकडे, अजित पवार 'राष्ट्रवादी परिवार मिलन' कार्यक्रमांतून पक्ष बांधणीवर भर देत आहेत. 2017 च्या पराभवानंतर राष्ट्रवादी पुन्हा सत्तेसाठी जोर लावत आहे.

पीसीएमसीच्या 128 जागांसाठी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच होईल. लांडगेंचा '100 पार' नारा यशस्वी होईल की पवार पुन्हा आपला बालेकिल्ला परत मिळवतील? हे पाहणं महत्वाचं राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT