Krishna prakash
Krishna prakash Sarkarnama
पुणे

शिवसेना नेत्याशी पंगा महागात! पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची मुदतपूर्व बदली

उत्तम कुटे: सरकारनामा ब्युरो

पिंपरी : आर्यनमॅन आणि अल्ट्रामॅन किताब जिंकणारे पिंपरी-चिंचवडचे (Pimapari Chinchwad) पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश तथा केपी (Krisha Prakash) यांनी नुकतीच (ता.१८) जगातील सर्वात जुनी ( १२६ वर्षे) जुनी बोस्टन मॅरेथॉन पूर्ण केली. त्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु असतानाच त्यांची मुदतपूर्व बदली झाल्याने त्यांनाच नव्हे ,तर पिंपरी-चिंचवडकरांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करण्याची मागणी लगेच सुरु झाली आहे. यातच त्यांच्या बदलीला कारणीभूत ठरलेल्या बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत.

पोलीस आयुक्त (Police Commissioner) केपी हे बोस्टन मॅरेथॉनसाठीअमेरिकेत गेलेले असून. उद्या (ता.२२)परतणार आहेत. त्यामुळे आज लगेच नवीन आयुक्त अंकुश शिंदे हे पदभार स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, या मुदतपूर्व बदलीमुळे केपी स्वत: नाराज झाल्याचे ऐकायला मिळाले.यापूर्वी व्हीआयपी सुरक्षेत (स्पेशल आयजी तथा विशेष पोलिस महानिरीक्षक) त्यांनी चार वर्षे काम केलेले आहे. त्यामुळे पुन्हा त्याच दुय्यम ठिकाणी (साइड पोस्टिंग) बदली झाल्याने अन्याय झाल्याची त्यांची भावना झाली असल्याचे समजते. व्हीआय़पी सुरक्षेचे काम करीत असतानाच २०१८ मध्ये त्यांनी अल्ट्रामॅन ही स्पर्धा जिंकली होती. तर, त्याच्या काही महिने अगोदरच २०१७ मध्ये त्यांनी आर्यनमॅन या किताबालाही गवसणी झाली होती. आता बोस्टन मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर त्यांची पुन्हा व्हीआयपी सुरक्षेतच बदली झाली, हा योगायोग आहे.

अनेक वादग्रस्त जमिनींच्या व्यवहारात लक्ष घातल्याने केपींची बदली झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली. यातील एक प्रकरण हे पिंपळे सौदागर या शहराच्या सर्वात आलिशान भागातील ४८ गुंठे जागेचे आहे. ही जागा शहरातील एक कुप्रसिद्ध बिल्डर आणि एका लोकप्रतिनिधीचा बिल्डर भावाच्या घशात घातल्याचा आरोप या जागेच्या मालकाने केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यात व इतरही अशा प्रकरणाबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे केपींविरुद्ध तक्रारी गेल्या होत्या. त्यातील एक हे शहरातील एका बड्या शिवसेना लोकप्रतिनिधीच्या निकटवर्तीयाशी सबंधित आहे. तेच केपींच्या बदलीला कारणीभूत ठरल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाने ही बदली रद्द करण्याची मागणी केली आहे.

केपी मूळचे झारखंडचे. ते 1998 च्या आयपीएस बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. मालेगाव, बुलडाणा, नगर, मुंबई आणि गडचिरोलीत त्यांनी यापूर्वी काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविलेला आहे. त्यांच्या आर्यनमॅन आणि अल्ट्रामॅनच्या यशात पुण्याचा वाटा आहे. त्यांचा या स्पर्धेचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुण्याचे ट्रायथलॉन प्रशिक्षक कौस्तुभ राडकर यांनी दिले होते. तसेच त्यांनी मानसलेक, पिरंगुट येथे पोहण्याचा सराव केला होता. मुंबई-पुणे असा रात्री एक वाजता ते सायकलिंगचा सराव करीत होते. प्रसिद्ध चंदन तस्कर वीरप्पन याच्यामुळे केपी अल्ट्रामन स्पर्धेसाठी उद्युक्त झाले, हे सांगितले, तर आश्चर्य वाटेल. पण ते खरे आहे. वीरप्पनला मारणारे के. विजयकुमार या एसटीएफच्या अधिकाऱ्याने लिहिलेल्या वीरप्पन या पुस्तकात 52 वर्षीय वीरप्पन हा 25 वर्षाच्या तरुणाएवढा फीट होता. तेवढी ऊर्जा त्याच्यात होती, असा उल्लेख आहे. हे वाचून गुन्हेगार एवढा फीट राहू शकतो, तर पोलीस का नाही या प्रश्नाने भंडावून सोडले आणि या स्पर्धेसाठी उद्युक्त झालो, असा अनुभव केपींनी २०१८ ला अल्ट्रामॅन झाल्यानंतर सरकारनामाशी बोलताना सांगितला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT